१२० जणांविरुद्ध गुन्हे दाखल; सात जणांना अटक

By Admin | Updated: October 18, 2014 01:13 IST2014-10-18T01:13:50+5:302014-10-18T01:13:50+5:30

रॅली पुढे नेण्याच्या मुद्यावरून गुरूवारी रात्री येथील सावरकर चौकात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

Criminal cases filed against 120 people; Seven people arrested | १२० जणांविरुद्ध गुन्हे दाखल; सात जणांना अटक

१२० जणांविरुद्ध गुन्हे दाखल; सात जणांना अटक

चंद्रपूर : रॅली पुढे नेण्याच्या मुद्यावरून गुरूवारी रात्री येथील सावरकर चौकात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. रॅलीतील कार्यकर्ते आणि वाहतूक पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांच्यात वाद होऊन पोलीस आणि कार्यकर्ते आमने-सामने आले. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला. रात्री उशिरा याप्रकरणी रामनगर पोलिसांनी सात जणांना अटक केली. याप्रकरणात तब्बल १२० लोकांना आरोपी करण्यात आले आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या आधाराने पोलिसांनी ही कारवाई केली.
ब्रह्मदीप खुशाल रामपुरे रा.भिवापूर वॉर्ड, अविनाश नत्थू बांबोडे, रा.बाबानगर, शुभम भीमराव खैरे, भिवापूर वॉर्ड, विजय दशरथ गोमासे राजनगर आरवट, अमित भीमराव खैरे, भिवापूर, रवी नानाजी, चंहादे, भिवापूर, प्रविण महादेव चुनारकर रा. भिवापूर यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भादंवि ३५३, १४३, ३४१, ४४७, ४४८, ३३२, ४२९, १४९, १४७ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. गुरूवारी रात्री उशिरा वाहतूक निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमीत्त गुरूवारी रात्री रॅली काढण्यात आली होती. स्थानिक प्रियदर्शिनी चौकात दोन रॅली एकत्र आल्या. त्यातील पुढे असलेली रॅली प्रियदर्शिनी चौकाच्या पुढे नागपूर मार्गावरील महाकाली ट्रॅव्हल्सपुढे थांबली. त्यामुळे या परिसरातील वाहतूक तुंबली होती. याच मार्गावर धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होती. त्यात रॅली मध्येच थांबविल्याने वाहतूक ठप्प पडली. यादरम्यान, वाहतूक निरीक्षक पुंडलिक सपकाळे व रॅलीतील कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रॅलीतील जमाव थेट रामनगर पोलीस ठाण्यासमोरील सावरकर चौकात पोहचला. तेथे या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे त्या परिसरातही तब्बल अर्धा तास वाहतूक ठप्प पडली. सपकाळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी लावून धरली. परिस्थिती चिघळत असल्याची बाब लक्षात येताच, पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल झाली. सोबत दंगा नियंत्रण पथकही तेथे पोहचले. या जमावातील काहींनी एका वाहनाच्या काचा फोडल्या. तसेच एका इंडिका चालकालाही मारहाण केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे या ठिकाणी बराच गोंधळ उडाला. काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. यावेळी पोलिसांनी सात जणांना अटक केली. मात्र पोलिसांनी संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन शहराच्या बंदोबस्तात वाढ केली. उशिरापर्यंत तणावाचे वातावरण कायम होते.
काढण्यात आलेली रॅली व डीजे वाजविण्यासंदर्भात आयोजकांनी नियमानुसार कोणतीही परवानगी घेतली नव्हती, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजू भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर १२० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)

Web Title: Criminal cases filed against 120 people; Seven people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.