नागरिक पितात गढूळ पाणी
By Admin | Updated: May 18, 2017 01:23 IST2017-05-18T01:23:25+5:302017-05-18T01:23:25+5:30
तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई सुरू आहे.

नागरिक पितात गढूळ पाणी
पोंभुर्णा तालुक्यातील प्रकार : लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
निळकंठ नैताम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई सुरू आहे. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही या गावातील नागरिक अंधारी नदीच्या पात्रातील मलमुत्र साचलेले अशुद्ध व गढूळ पाणी पितात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकाराकडे मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी व पाणी पुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथे अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा केला जातो.
नदीच्या पात्रामध्ये परिसरातील अनेक पाळीव जनावरे पाणी पिण्यासाठी जात असतात आणि त्याठिकाणी बसतात. त्यामुळे तिथे त्यांचे मल, मुत्र साचत असते. याच ठिकाणी परिसरातील निधन झालेल्या व्यक्तींचा अंत्यविधीसुद्धा केला जातो. ते पाणीसुध्दा नदीतील पात्रात असलेल्या विहीरीमध्ये जात असते. तिथूनच ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नळाद्वारे ग्रामस्थाला पाणी पुरवठा केला जातो. नदीतील पाण्याचा प्रवाह सुरू असताना पाणी काही प्रमाणात बरे असते. परंतु नदीचे पात्र जेव्हा एप्रिल महिन्यात कोरडे होते, तेव्हा खड्डयामध्ये साचलेल्या घाण पाण्यावरच या गावातील नागरिकांना आपली तहान भागवावी लागते. नळाद्वारे पाणी येत असताना या पाण्यातून दुर्गंधी येत असते. परंतु दुसरी कुठलीच उपाययोजना नसल्याने नाईलाजास्तव स्थानिक नागरिकांना हेच पाणी प्यावे लागत आहे. हा प्रकार याठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू आहे.
मात्र याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वारंवार गावकऱ्यांनी निवेदन देऊनसुद्धा याठिकाणी अजूनपर्यंत पाण्याची कुठलीच पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. गेल्या १५ वर्षांपासून अंधारी नदीच्या पात्रावर असलेल्या विहीरीतील गाळ काढला नसून त्या विहीरीमध्ये जवळपास ८ ते १० फुट गाळ साचलेला आहे.
या गावातील मजूर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सकाळी कामावर जात असतात. कामावरून आल्यावर पाण्यासाठी उन्हामध्ये दुरवरून विहीरीचे पाणी त्यांना आणावे लागते. याठिकाणी पाण्याची पातळी फार खोलवर असल्याने विहीरींनासुद्धा फारसे पाणी नाही. आपल्या सोबतच त्यांना शेतात राबणाऱ्या जनावरांनासुद्धा पाणी द्यावे लागते. स्थानिकांना इतर कामे बाजुला सारून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे पाण्यासाठी तीव्र संघर्ष करण्याची पाळी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांवर आली आहे.