माळढोक पक्ष्याच्या संवर्धनासाठी ग्रास लॅन्डची निर्मिती
By Admin | Updated: July 26, 2014 01:44 IST2014-07-26T01:44:47+5:302014-07-26T01:44:47+5:30
जगातील अंत्यत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या माळढोक पक्ष्याचे

माळढोक पक्ष्याच्या संवर्धनासाठी ग्रास लॅन्डची निर्मिती
वन विभागाचा पुढाकार : टेमुर्डा येथे संशोधन केंद्रही उभारणार
वरोरा : जगातील अंत्यत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या माळढोक पक्ष्याचे अस्तित्व मागील दहा वर्षापासून वरोरा तालुक्यात आहे. माळढोक पक्ष्याच्या संख्येत दिवसागणीक वाढ होत आहे. त्यामुळे माळढोक पक्ष्याचे संवर्धन करण्याकरिता वनविभाग मागील दहा वर्षापासून सातत्याने प्रयत्न करीत आहे. आता माळढोकच्या संवर्धनाकरिता वरोरा तालुक्यातील टेमुर्डा वनक्षेत्रांतर्गत रामपूर गावाच्या शिवारातील वन विभागाच्या २५ हेक्टर जागेवर ग्रॉस लॅन्ड तयार करण्यात येणार आहे. यासोबतच टेमुर्डा येथे संशोधन केंद्रही उभारले जाणार आहे.
माळढोक पक्षी शेतातील लहान व मोठे किडे, साप, विंचू आदीचे भक्षण करीत असल्याने त्याला शेतकऱ्याचा मित्र मानला जाते. २००४ मध्ये वरोरा तालुक्यात माळढोक पक्षी चारच्या संख्येत आढळून आले. आता माळढोक पक्षाची संख्या अकरा असल्याचे मानले जात आहे. जगातील अंत्यत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या माळढोक पक्ष्याचा वरोरा भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्याच्या वावर वाढावा याकरिता वन विभाग परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन अनेक उपक्रम राबवीत आहे. शेतात माळढोक पक्षाने अंडी दिल्यास त्याचे जतन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, शेंद्रीय खताने शेती तयार करावी, याकरिता शेंद्रीय खते उपलब्ध करुन देणे असे उपक्रम वनविभाग राबवित आहे. आता माळढोक पक्षाला पोषक वातावरण तयार व्हावे, याकरिता वनविभागाच्या कॉन्पेन्सेटरी अॅपारस्टेशन फंड मॅनेजमेंट अॅन्ड प्लॅनिंग अॅथारिटी (कॅम्पा)च्या वतीने निधी देण्यात आला आहे. यामध्ये टेमुर्डा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या रामपूर गावानजीकच्या वनविभागाच्या २५ हेक्टर जमिनीवर नुकतेच वैद्य, मारवेल, मुशान, कुंदा या गवताची नुकतीच तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनात लागवड करण्यात आली आहे. तर त्या नजीक एक मोठ्या तलावाची निर्मितीही करण्यात आली आहे. सध्या लावण्यात आलेले गवत माळढोक पक्षासाठी पोषक असल्याने गवत मोठे झाल्यानंतर या भागात माळढोक पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. नुकतेच लावलेले विविध जातीचे गवत परिसरातील नर्सिरीमधून तयार करण्यात आल्याची माहिती टेमुर्डा वनपरिमंडळ अधिकारी संतोष औतकर यांनी दिली. माळढोक पक्ष्याच्या अभ्यासाकरिता एका वास्तुची निर्मितीही टेमुडा येथे करण्यात येणार असून त्याला संशोधन केंद्र असे नाव देण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)