एकात्मिक कृषी क्लस्टर आराखडा तयार करा

By Admin | Updated: August 11, 2015 01:40 IST2015-08-11T01:40:40+5:302015-08-11T01:40:40+5:30

जिल्हयातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी चंद्रपूर जिल्हयाचा एकात्मिक कृषी क्लस्टर आराखडा तयार करण्यात यावा.

Create an integrated agricultural cluster plan | एकात्मिक कृषी क्लस्टर आराखडा तयार करा

एकात्मिक कृषी क्लस्टर आराखडा तयार करा

सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना : सुविधा केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न
चंद्रपूर : जिल्हयातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी चंद्रपूर जिल्हयाचा एकात्मिक कृषी क्लस्टर आराखडा तयार करण्यात यावा. यात हळद क्लस्टर, भाजीपाला क्लस्टर, लाख क्लस्टर, टसर क्लस्टर, शिंगाडा क्लस्टर, बांबू क्लस्टर, फलोत्पादन क्लस्टर व धान क्लस्टरचा प्रामुख्याने समावेश करण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी विभागाला दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, आत्माच्या संचालक डॉ.विद्या मानकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ, कृषी विकास अधिकारी विकास देशमुख व अधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हयातील शेतक-यांना त्यांच्या जमिनीचे स्वॉईल हेल्थ कार्ड देण्यासाठी नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हयात हळदीचे ९९३ हेक्टर लागवड क्षेत्र असून या क्षेत्रात वाढ करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. हळद या पीक लागवडीकडे शेतक-यांचा ओढा वाढत असून त्यांच्यासाठी सुविधा केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.
हे सुविधा केंद्र सहकारी तत्वावर शेतक-यांचेच असावे, असे ते म्हणाले. जिल्हयाचा एकात्मिक कृषी क्लस्टरचा आराखडा तयार करतांना शेतकऱ्यांशी विचार विनिमय करुन त्यांच्या सूचना यात समाविष्ट कराव्यात. भाजीपाला क्लस्टर तयार करण्यासाठी पंजाब नॅशल बँक मार्गदर्शन युनिट उभारण्यास तयार असल्याचे सांगून कोठारी या भागात भाजीपाला क्लस्टर उभारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पालकमंत्री म्हणाले. जिल्हयाच्या एकात्मिक कृषी क्लस्टरसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे ते म्हणाले.
जिल्हयाच्या एकात्मिक कृषी क्लस्टरचा आराखडा तयार करुन एक महिण्यात सादरीकरण करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. वनऔषधी, चणा क्लस्टर, कुक्कुट पालन, मासेमारी, शेंद्रीय शेती व मका याचाही समावेश करण्यात यावा. जेणे करुन शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही ना.मुनगंटीवार यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Create an integrated agricultural cluster plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.