बाजार समित्यांत कापसाची आवक वाढली

By Admin | Updated: November 7, 2016 01:24 IST2016-11-07T01:24:41+5:302016-11-07T01:24:41+5:30

खरीप हंगामाच्या पूर्वी मशागतीपासून सातत्याने शेतात पैसे ओतणारा शेतकरी आता प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. पीक हातात येत आहे.

Cotton arrivals have increased in market committees | बाजार समित्यांत कापसाची आवक वाढली

बाजार समित्यांत कापसाची आवक वाढली

दरामुळे शेतकरी चिंतेतच : जिल्ह्यात तीन ठिकाणी कापूस खरेदी
चंद्रपूर : खरीप हंगामाच्या पूर्वी मशागतीपासून सातत्याने शेतात पैसे ओतणारा शेतकरी आता प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. पीक हातात येत आहे. मात्र भाव पटण्याजोगा नाही. तरीही आर्थिक विवंचनेतून कापूस उत्पादन कापूस विकायला काढत आहे. याचा फायदा उचलत व्यापाऱ्यांनीही कापूस खरेदीचा प्रारंभ केला आहे. जिल्ह्यात राजुरा, वरोरा, माढेळी या ठिकाणी बाजार समितींच्या माध्यमातून कापूस खरेदी सुरू असून समित्यात कापसाची आवक वाढू लागली आहे.
यावर्षीचाही खरीप हंगाम शेतकऱ्यांना चिंतेतच टाकून गेला. प्रारंभी पाऊस व्यवस्थित पडल्यानंतर पुढे पावसाने दडी मारली. अनेक दिवस पावसाचा पत्ताच नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अधिकचा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला. त्यानंतर कसेबसे पीक वाचल्यानंतर वातावरणाच्या बदलामुळे पिकांवर रोगराई पसरली. यातही शेतकऱ्यांनी पुन्हा पैसा खर्च करावा लागला. एवढे करूनही ऐन पीक हाती येत असताना परतीच्या पावसाने कहर केला. यात पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता जे पीक आहे, ते विकतो म्हटले तर पिकांना भाव नाही. कापसाबाबत अशीच परिस्थिती दिसून येत आहे. मात्र पैशाची गरज असल्याने शेतकरी कापूस विक्रीसाठी बाहेर काढत आहेत.
शेतकऱ्यांच्या या अडचणीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरू केली आहे. वरोरा, माढेळी, राजुरा या ठिकाणी बाजार समित्यांच्या माध्यमातून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत वरोरा येथील रवी कमल कॉटेक्स व माढेळी येथील पारस कॉटनमध्ये ५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला. कापूस खरेदीचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विशाल बदखल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती राजू चिकटे, संचालक किशोर भलमे, देवानंद मोरे, राजू आसुटकर, हरिदास जाधव, बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे, सहा सचिव सचिन डहाळकर, लेखापाल किशोर महाजन, निरीक्षक कन्हैया वरुटकर आदी कर्मचारी उपस्थित होते. कापूस ठेवून येणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. रविकमल काटेक्समध्ये प्रति क्विंटल ४७२५ रुपये तर पारस कॉटन माढेळी येथे प्रति क्विंटल ४७०७ रुपये दर देण्यात आला. रविकमल कॉटेक्समध्ये पहिल्या दिवशी ५९० क्विंटल तर पारस कॉटन येथे ८६० क्विंटल कापसाची आवक झाली.
यासोबतच भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार मुर्सा येथील केंद्रावरही कापूस खरेदीची सुरूवात करण्यात आलेली आहे.
कापसाला ४६५० ते ४७४१ रु. प्रति क्वि. भाव देण्यात आला. येथे आतापर्यंत २५ गाड्याची आवक झालेली आहे. बाजार समितीचे सभापती वासुदेव ह. ठाकरे यांनी पहिल्या बैलगाडीचे शेतकरी शंकर भाऊराव देहारकर रा. घोनाड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच सदर कार्यक्रमाला उपस्थित बाजार समितीचे सदस्यांनी शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.
विशेष म्हणजे, कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार होत असला तरी शेतकरी मात्र मिळणाऱ्या अल्प दरामुळे नाखूश असल्याचे दिसून येत आहे. कापसाचा दर पटण्याजोगा नाही; तरीही पैशाच्या गरजेपोटी नाईलाजाने त्यांना आपला कापूस विक्रीसाठी काढावा लागत आहे. सद्यस्थितीत बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक वाढू लागली आहे. (शहर प्रतिनिधी)

सहा हजारांहून अधिक दर हवा
शेतीच्या मशागतीपासून पीक हाती येईलपर्यंतचा लागवडी खर्च विचारात घेतला तर शेतकऱ्यांना कापसाला सहा हजारांहून अधिक दर हवा आहे. शासनाने अद्यापही शासकीय दर घोषित केलेला नाही. व्यापारी वाट्टेल तसा दर देऊन विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
दिवाळी अंधारात
कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेपोटी अनेक शेतकऱ्यांनी पीक हाती येऊनही विक्रीसाठी काढले नाही. आज ना उद्या भाव वाढेल, याची प्रतीक्षा करीत असतानाच दिवाळी आली. कापूस विकला नाही म्हणून पैसेही आले नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली.

Web Title: Cotton arrivals have increased in market committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.