कोरपना नगरी शैक्षणिक क्षेत्रात मागासलेलीच

By Admin | Updated: October 27, 2014 22:34 IST2014-10-27T22:34:25+5:302014-10-27T22:34:25+5:30

तेलंगणाच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय म्हणून कोरपना शहराची ओळख आहे. तालुका निर्मिती होऊन २४ वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटला आहे. मात्र, तालुक्याचे गाव असलेला कोरपना शहर

Corpanna is backward in the city's educational field | कोरपना नगरी शैक्षणिक क्षेत्रात मागासलेलीच

कोरपना नगरी शैक्षणिक क्षेत्रात मागासलेलीच

वनसडी : तेलंगणाच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय म्हणून कोरपना शहराची ओळख आहे. तालुका निर्मिती होऊन २४ वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटला आहे. मात्र, तालुक्याचे गाव असलेला कोरपना शहर आजही शैक्षणिकदृष्ट्या अविकसितच आहे.
या परिसरातील हजारो विद्यार्थी दररोज चंद्रपूर, गडचांदूर, शिंदोला, राजुरा, बल्लारपूर, उपरवाही, नांदा, जिवती आदी ठिकाणी असलेल्या शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेवून ‘अपडाऊन’ करतात. आर्थिकदृष्ट्या हे परवडणारे नसले तरी या खेरीज विद्यार्थी व पालकांपुढे पर्याय नाही. त्यामुळे कोरपन्यातील विद्यार्थी मुंबई, पुणे, हैद्राबाद सारख्या महानगरांपासून ते वणी, वरोरा, आदिलाबाद सारख्या जवळच्या शहरात शिक्षणासाठी प्रवेश घेताना दिसत आहेत. कोरपना शहरात अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालये आहे. परंतु पाल्याच्या शैक्षणिक बाबीचा विचार करता तेही ‘अपडाऊन’च करणे पसंद करतात.
शैक्षणिकदृष्ट्या अविकासामुळे कोरपन्यात बाहेरून आलेले नागरिक सहसा स्थिरावत नाही. केवळ शिक्षणामुळे येथे नागरिक स्थायी होत नाही, हे दुदैव आहे. या ठिकाणी ५ कॉन्व्हेंट, १ प्राथमिक शाळा, २ माध्यमिक शाळा, २ कनिष्ठ महाविद्यालय, १ वरिष्ठ महाविद्यालय, १ पॉलीटेक्नीक महाविद्यालय, १ आश्रमशाळा, आय.टी.आय., १ मॅनेजमेंट कॉलेज आहे. परंतु विज्ञान, वाणिज्य, एम.सी.व्ही.सी., पदव्युत्तर शिक्षणातील अनेक विद्या शाखेचे अभ्यासक्रम येथे नसल्यामुळे येथील विद्यार्थी इतर ठिकाणी शिक्षणासाठी जातात.
आज विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल विज्ञान, व्यावसायिक तंत्र शाखेकडे आहे. मात्र तालुक्याच्याच ठिकाणी अभ्यासक्रम नाही म्हटल्यावर आजुबाजुच्या गावातील शैक्षणिक विकास कसा होईल? हे या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त व मागासलेल्या तालुक्याबाबत कल्पना न केलेलीच बरी.
येथील प्राथमिक शाळा सध्या आॅक्सिजनवर असल्याचे दिसते. शाळेचा शैक्षणिक दर्जा ‘क’ आहे. दिवसेंदिवस हा दर्जा घटतच चालला. त्यामुळे पटसंख्याही कमी होत आहे. भविष्यात येथील शाळा दर्जात्मक शिक्षण व पायाभूत सुविधा अभावी बंद पडते की काय? अशी भिती व्यक्त होत आहे. संगणक असले तरी संगणकीय शिक्षणापासून तालुकास्तरावरचेच विद्यार्थी वंचित आहे.
येथील पंचायत समितीने शाळेतील दोन संगणक आपल्या कार्यालयीन उपयोगासाठी नेले असल्याने येथील प्राथमिक शिक्षणाचा पाया केवळ आनास्थेमुळे अधूर होत चालला आहे. भविष्यात शिक्षणात आपल्या पाल्याची राखरांगोळीच होईल, या भितीने पालकांनी विद्यार्थ्यांना इतरत्र ठिकाणी प्रवेश घ्यायला लावले आहे. शैक्षणिकदृष्ट्या वातावरण पोषक नसल्याने अनेक विद्यार्थी बालमजुरीकडे वळताना दिसतात. तालुका औद्योगिकदृष्ट्या प्रगत असला तरी कोरपना परिसरात उद्योगांचा पत्ता नाही. त्यामुळे येथून शिकलेले सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी येथे राहत नाही. विद्यार्थ्यात शिक्षणांविषयी गोळी निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण निर्मितीची गरज आहे.
काही शाळांचा शैक्षणीक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्या शाळांना विविध अभ्यासक्रम व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन कोरपन्याचा शैक्षणिक दृष्ट्या खुंटलेला विकास करणे गरजेचे आहे. गोंडवाना विद्यापीठ व शिक्षण विभाग विविध शैक्षणिक उपक्रम राबवून या तालुकास्तरावरची शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Corpanna is backward in the city's educational field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.