कोरोना पॉझिटिव्ह बापलेक तासाभरात झाले निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST2021-01-03T04:28:56+5:302021-01-03T04:28:56+5:30
वरोरा शहरतील एका उच्च विद्याविभूषित व्यक्तीने आपल्या मुलीसह वरोरा येथील कोविड केअर सेंटर गाठून आरटीपीसीआर चाचणी केली. दुसऱ्या दिवशी ...

कोरोना पॉझिटिव्ह बापलेक तासाभरात झाले निगेटिव्ह
वरोरा शहरतील एका उच्च विद्याविभूषित व्यक्तीने आपल्या मुलीसह वरोरा येथील कोविड केअर सेंटर गाठून आरटीपीसीआर चाचणी केली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी भ्रमणध्वनीवर अहवाल पाॅझिटिव्ह असल्याचा संदेश आला. कोरोनाची लागण झाल्याचे गृहित धरून या बापलेकीने गृह विलगीकरणाची तयारी सुरू केली. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून तातडीने खासगी वैद्यकीय अधिकऱ्याकडून औषधे लिहून आणली. काही वेळात ते सहज आपला भ्रमणध्वनी हातात घेऊन बघत असताना त्यात दोघांचाही अहवाल निगेटिव्ह असल्याचा लघु संदेश आलेला होता. हा संदेश बघून गोंधळ उडाला. तातडीने वरोरा येथील कोविड केअर सेंटर गाठले आणि भ्रमणध्वीवरील संदेशाची शहानिशा केली. तेथून चंद्रपूर येथील स्वॅब तपासणी केंद्राकडे विचारणा केली असता दोघांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. त्यांना गृह विलगीकरणाची गरज नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकाराने त्या कुटुंबीयांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिला जातो. संबंधित व्यक्ती कोरोना निगेटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
- डॉ. अंकुश राठोड, प्रमुख, कोविड केअर सेंटर, वरोरा.