कोरोना रुग्णाचा मृतदेह अर्धवट जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:46 IST2021-05-05T04:46:05+5:302021-05-05T04:46:05+5:30
सिंदेवाही : शहरातील कोविड सेंटरवर असलेल्या एका रुग्णाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. आरोग्य विभागाने मृतदेह अंत्यविधीसाठी नगरपंचायतीकडे ...

कोरोना रुग्णाचा मृतदेह अर्धवट जळाला
सिंदेवाही : शहरातील कोविड सेंटरवर असलेल्या एका रुग्णाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. आरोग्य विभागाने मृतदेह अंत्यविधीसाठी नगरपंचायतीकडे सुपुर्द केला. नगरपंचायतीचे कर्मचारी सिंदेवाही स्मशानभूमीत भडाग्नी देऊन घरी परतले. मात्र, लाकडाच्या कमतरतेमुळे मृतदेह अर्धवट जळाल्याचा आरोप मृतकाच्या भावाने केला आहे.
धुमनखेडा येथील एक युवक सिंदेवाही येथील कोविड सेंटरमध्ये तीन दिवसांपासून उपचार घेत होता. सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाइकांना कळविल्यानंतर दुपारी ४ वाजतादरम्यान मृतदेह नगरपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात आला. कर्मचारी मृतदेहाला भडाग्नी देऊन लाकडे कमी असल्याने लाकडे आणायला गेले. या दरम्यान मृतकाचा भाऊ तिथे गेला असता, त्याला मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत दिसला. त्यानंतर, हा प्रकार सोशल मीडियावर वायरल झाला. याबाबत मुख्याधिकारी डॉ.सुप्रिया राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, मृतदेहावर अंत्यविधी पार पाडल्यानंतर लाकडे कमी असल्याने कर्मचारी लाकडे आणायला गेले. याच दरम्यान सिंदेवाहीत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मृतदेह पूर्णपणे जळू शकला नाही. कर्मचारी लाकडे घेऊन स्मशानभूमीत गेले. मात्र, पाऊस असल्याने ते तिथेच थांबले आहेत. मृतदेह पूर्णपणे जाळला जाईल, असेही त्या म्हणाल्या.