अमृत योजनेच्या खोदकामामुळे महानगरात दूषित पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:00:53+5:30

अमृत योजनेसाठी निधी मिळताच कामे सुरू झाली. अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्यानंतर हे काम काही काळासाठी बंद होते. त्यामुळे योजनेला विलंब होत गेला. आता २३ मार्चपासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले. याचा फायदा घेत मनपाने शहरात पुन्हा अमृत योजनेचे काम सुरू केले. यासाठी पुन्हा चांगले रस्ते फोडण्यात आले. अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले.

Contaminated water supply in the metropolis due to excavation of Amrut Yojana | अमृत योजनेच्या खोदकामामुळे महानगरात दूषित पाणी पुरवठा

अमृत योजनेच्या खोदकामामुळे महानगरात दूषित पाणी पुरवठा

Next
ठळक मुद्देअनेक ठिकाणी पाईपलाईन होती फुटली : पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात अमृत योजनेसाठी लॉकडाऊनच्या काळात खोदकाम करण्यात आले. यात योजनेची पाईपलाईन टाकताना अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनही फुटल्या. मात्र त्या नंतर थातुरमातूर दुरुस्त करून खोदलेले खड्डे बुजविण्यात आले. दोन दिवसांपूर्वी पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवठा झाला. आता पावसाळ्यात ही समस्या आणखी बिकट होणार आहे.
पाच वर्षांपूर्वी महानगरपालिका चंद्रपूर शहराला मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचा प्रस्ताव मंजूर केला. या योजनेंतर्गत शहरात कधीच पाणी टंचाई जाणवणार नाही, असे प्रशासनाचे मत आहे. मात्र एवढ्या वर्षांनंतरही ही योजना अद्याप पूर्णत्वास येऊ शकली नाही. अजूनही या योजनेचे काम सुरूच आहे. काही वर्षांपूर्वी भूमिगत मलनिस्सारण योजनेसाठी शहरातील ९० टक्के भागात खोदकाम करण्यात आले होते. यावेळी बरेच चांगले रस्ते फोडण्यात आले होते. त्यानंतर नव्याने रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. नवे रस्ते तयार होताच अमृत योजना आली. त्यामुळे पुन्हा रस्ते फुटणार, हे निश्चित होते.
अमृत योजनेसाठी निधी मिळताच कामे सुरू झाली. अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्यानंतर हे काम काही काळासाठी बंद होते. त्यामुळे योजनेला विलंब होत गेला. आता २३ मार्चपासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले. याचा फायदा घेत मनपाने शहरात पुन्हा अमृत योजनेचे काम सुरू केले. यासाठी पुन्हा चांगले रस्ते फोडण्यात आले. अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले. हे करताना सध्या अस्तित्वात असलेली पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली. त्यामुळे त्या भागातील पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. नागरिकांची ओरड झाल्यानंतर ही पाईपालाईन थातुरमातूर दुरुस्त करून मजुरांनी खोदकाम मातीने बुजवून टाकले. आता पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी अकाली पाऊस पडल्यानंतर कित्येक भागात दूषित पाणी पुरवठा झाला. भविष्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर दूषित पाण्याची समस्या आणखी बिकट होणार आहे.

५३७ किमीची पाईपलाईन
अमृत योजनेसाठी शहरभर एकूण ५३७ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. यापैकी बरीच कामे झाली आहे. त्यामुळे सहाजिकच एवढ्या मोठ्या परिसरात खोदकाम झाले असल्याने पाईपलाईनही बऱ्याच ठिकाणी फुटली आहे.

अस्तित्वातील पाईपलाईन खिळखिळी
सध्या चंद्रपूर शहराला पाणी पूरवठा करणारी पाईपलाईन ४०-५० वर्ष जुनी आहे. त्यामुळे ती खिळखिळी झाली आहे. ही पाईपलाईन कालबाह्य झाल्याचे काही वर्षांपूर्वीच स्पष्ट झाले होते. मात्र पाईपलाईन बदलविण्याचे सौजन्य तेव्हा मनपा प्रशासनाने दाखविले नाही. या खिळखिळ्या पाईपलाईनमुळे दरवर्षी पावसाळ्यात अनेक भागात दूषित पाणी पूरवठा होतो.

पालकमंत्र्यांच्या सूचना
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मनपामध्ये विविध कामाचा आढावा घेतला तेव्हा अमृत योजनेच्या खोदकामामुळे शहरात दूषित पाणी पुरवठा होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली होती. त्यादृष्टीने तत्काळ उपाययोजना करण्याच्या व नागरिकांना अशुध्द पाण्याचा पुरवठा होऊ नये, यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या होत्या, हे विशेष.

Web Title: Contaminated water supply in the metropolis due to excavation of Amrut Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी