गरज नसतांनाही बंधाऱ्याचे बांधकाम
By Admin | Updated: July 17, 2014 00:01 IST2014-07-17T00:01:21+5:302014-07-17T00:01:21+5:30
तालुक्यातील कापसी ग्रामपंचायतीने गरज नसतांनाही बंधाऱ्याचे बांधकाम करून शासनाच्या तिजोरीला लाखो रुपयाचा चूना लावल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.

गरज नसतांनाही बंधाऱ्याचे बांधकाम
चौकशीची मागणी: शासनाला लाखो रुपयांचा चूना
सावली : तालुक्यातील कापसी ग्रामपंचायतीने गरज नसतांनाही बंधाऱ्याचे बांधकाम करून शासनाच्या तिजोरीला लाखो रुपयाचा चूना लावल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.
२०१३-१४ या वित्तीय वर्षात २५ एप्रिल २०१३ रोजी बंधारा बांधण्याचा ठराव ग्रामपंचायतीने पारित केला. त्यानुसार सहा लाख ६८ हजार ३५० रुपये अंदाजपत्रक असलेला बंधारा जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने मंजूर केले. मात्र त्या बंधाऱ्याची गरज नसतांनाही २०० मीटर अंतरावर आधीच दोन बंधारे बांधण्यात आले. तिसऱ्या बंधाऱ्याला मंजुरी देण्यात येऊन त्याचे बांधकामही पूर्ण झाले. एवढेच नाही तर, सुरेश वसंत भांडेकर नामक व्यक्तीच्या नावाने सदर बंधारा बांधकामाची निविदा ग्रामपंचायतीने मंजूर कली. परंतु त्याच्याकडे कच्चा माल पुरविण्याचे कोणतेही साधन नसतांना बंधारा बांधकामाची मंजूरी दिलीच कशी? असा गावकऱ्यांचा आरोप आहे. शिवाय बंधारा पूर्ण होऊन त्याच्या बिलाची उचलही करण्यात आली. परंतु अजुनही बंधाऱ्याला दरवाजे लावण्यात आलेले नाही. सदर बंधारा गरज म्हणून नाही तर केवळ पैसे कमविण्याच्या उद्देशाने बांधण्यात आल्याचे गावकऱ्यांचे म्हणने आहे.
ज्या परिसरात बंधारा बांधण्यात आला त्या परिसरातील एकाही शेतकऱ्याची परवानगी घेण्यात आली नाही किंवा त्या शेतकऱ्यांना सदर बंधाऱ्यापासून कोणतेही सिंचन होणार नसल्यामुळे या बंधाऱ्याची आवश्यकता काय. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच बंधाऱ्याचे कामही निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. त्यामुळे सदर बांधकामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)