चिमूर सहकारी तांदूळ गिरणी निवडणुकीत काँग्रेस गटाचे वर्चस्व

By Admin | Updated: August 24, 2015 01:18 IST2015-08-24T01:18:23+5:302015-08-24T01:18:23+5:30

चिमूर सहकारी भात गिरणी समिती चिमूरची निवडणूक गुरूवारी जिल्हा परिषद कन्या हायस्कूलमध्ये पार पडली.

Congress party dominates Chimur cooperative rice mill elections | चिमूर सहकारी तांदूळ गिरणी निवडणुकीत काँग्रेस गटाचे वर्चस्व

चिमूर सहकारी तांदूळ गिरणी निवडणुकीत काँग्रेस गटाचे वर्चस्व

चिमूर : चिमूर सहकारी भात गिरणी समिती चिमूरची निवडणूक गुरूवारी जिल्हा परिषद कन्या हायस्कूलमध्ये पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटाने सात जागा जिंकून वर्चस्व प्राप्त केले व भाजपा समर्थित गटाला पुन्हा सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले.
चिमूर सहकारी भात गिरणी समितीमध्ये १३ संचालक पाच वर्षे कालावधीसाठी निवडले जातात. यात पिंपळनेरी गटातून संदीप शिरभैय्ये हे अविरोध निवडून आल्याने काँग्रेस गटात अगोदरच एका संचालकाची भर पडल होती. असे असले तरी या निवडणुकीत दोन्ही गटाने वर्चस्वाच्या लढाईत साम-दाम-दंड वापरून निवडणूक चुरशीची केली. विशेष म्हणजे काँग्रेस गटाकडून प्रा.दादा दहिकर तर भाजपा गटाकडून प्रवीण गणोरकर हे जवळचे नातलग एकमेकांच्या विरोधात होते. प्रा.दादा दहिकर यांनी दोन मते जास्त घेवून गणोरकर यांचा पराभव केला. भाजपा गटात सहकारी भात गिरणीच्या संस्थापकापासूनच्या कुटुंबातील योगेश ऊर्फ श्रीकांत नाकाडे व विद्या नाकाडे हे मायलेक विजयी झाले.
काँग्रेस गटात संदीप शिरभैय्ये, डॉ. संजय बोढे, नथ्थू तळवेकर, शामराव घरत, पांडुरंग पचारे, रसीका नाकाडे, प्रा.दादा दहीकर हे सात संचालक निवडून आल्याने वर्चस्व प्राप्त केले तर भाजपा गटातून विद्या नाकाडे, श्रीकांत नाकाडे, मधुकर नन्नावरे, डॉ.श्याम हटवादे, मधुकर भलमे, अशोक पोटदुखे हे सहा संचालक निवडून आले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रस्सीखेच आहे.
निवडून आलेले संचालक एकत्रीत राहतील काय? याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेस गटाकडून सहकार युवा नेते संजय कुंभारे, संजय डोंगरे यांनी नेतृत्व केले तर भाजपाकडून डॉ.श्याम हटवादे, विलास नाकाडे यांनी नेतृत्व केले. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक राजू अगडे, चव्हाण यांनी काम पाहिले तर पी.एस.आय. नैताम यांच्यासह त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
चिमूर सहकारी भात गिरणीमध्ये आमदार विजय वडेट्टीवार, आमदार मितेश भांगडिया हेदेखील मतदार होते. परंतु त्यांनी मतदानाचा हक्क बजाविला नाही.
एक किंवा दोन मताने पराभूत झालेले उमेदवार या दोन नेत्यांच्या गैरहजेरीने हळहळ व्यक्त करीत होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Congress party dominates Chimur cooperative rice mill elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.