लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विदर्भातील काँग्रेससाठी धक्कादायक घडामोड पुढे आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रभावी वारजूकर कुटुंब भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे निष्ठावंत माजी आमदार अविनाश वारजूकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूकर आणि शंकरपूरचे सरपंच साईश सतीश वारजूकर गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजता मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश करणार आहेत. या तिघांनीही बुधवारी संध्याकाळी काँग्रेसचा राजीनामा दिला.
मुंबईतील या प्रवेश सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वारजूकर बंधूंचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. या निर्णयामागे काँग्रेसमधील दीर्घकाळ गटबाजीचा कंटाळा हे प्रमुख कारण असल्याचे वारजूकर समर्थकांचे म्हणणे आहे. या घडामोडीमुळे विदर्भातील काँग्रेससमोरील आव्हाने वाढणार का आणि भाजपची पकड अधिक मजबूत होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
वर्षा बंगल्यावर निर्णायक भेट
वारजूकर बंधूनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याची चर्चा असून, या भेटीत भाजपत प्रवेशाचा निर्णय अंतिम झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या बैठकीस चिमूरचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया उपस्थित होते, असेही सांगितले जाते.या पक्षांतरानंतर वारजूकर बंधूंना विधान परिषद सदस्यपद, महामंडळातील जबाबदारी व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत पुष्टी नसली तरी विविध पदांबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
विदर्भातील समीकरणांवर परिणाम
चिमूर मतदारसंघात भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांच्याशी वारजूकर बंधूंशी मागील तीन निवडणुकांत थेट लढत झाली होती. या पार्श्वभूमीवर वारजूकर बंधूंच्या भाजप प्रवेशामुळे स्थानिक, तसेच राज्य पातळीवरील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या संघटनात्मक २ ताकदीला धक्का बसण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.
वारजूकर कुटुंबाची काँग्रेसमधील कारकीर्द
अविनाश वारजूकर : १९९९- २००४ चिमूरचे आमदार; खनिकर्म विकास महामंडळाचे माजी अध्यक्षसतीश वारजूकर : सलग तीनदा जि.प. सदस्य; २००९-१२ जि.प. अध्यक्ष; नंतर काँग्रेस जि.प. गटनेता.साईश वारजूकर : २०२१ पासून शंकरपूरचे सरपंच; युवक नेतृत्वात सक्रिय
"जिल्हा मध्यवर्ती बँक आणि चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेसने बहुमत असताना नेत्यांच्या गटबाजीत भाजपच्या झोळीत टाकल्या. यामुळे जनतेचा पक्षावरून विश्वास उडाला आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपत जाण्याचा निर्णय घेतला."- सतीश वारजूकर, चिमूर जि. चंद्रपूर.
Web Summary : In a blow to Congress, the influential Warjukar family from Chandrapur, including ex-MLA Avinash Warjukar, joined BJP. Internal Congress politics is cited as the reason. This shift could significantly impact political dynamics in Vidarbha.
Web Summary : कांग्रेस को झटका, चंद्रपुर के प्रभावशाली वारजूकर परिवार, पूर्व विधायक अविनाश वारजूकर सहित, भाजपा में शामिल हुए। कांग्रेस की आंतरिक राजनीति को कारण बताया गया है। इस बदलाव का विदर्भ में राजनीतिक समीकरणों पर महत्वपूर्ण प्रभाव पड़ सकता है।