भिक्षेकऱ्यांची अवस्था बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:53+5:302021-04-23T04:29:53+5:30
नागभीड : लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यूने भिक्षेवर जीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्तींची अवस्था अतिशय गंभीर होत आहे. हे अधोरेखित करणाऱ्या ...

भिक्षेकऱ्यांची अवस्था बिकट
नागभीड : लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यूने भिक्षेवर जीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्तींची अवस्था अतिशय गंभीर होत आहे. हे अधोरेखित करणाऱ्या दोन घटना नागभीड तालुक्यात नुकत्याच पुढे आल्या आहेत.
तालुक्यातील तळोधी येथील प्रवासी निवाऱ्यात एक वृद्ध दाम्पत्य बऱ्याच दिवसांपासून वास्तव्यास आहे. भीक मागून उदरनिर्वाह करणे हा त्यांचा जीवनक्रम. मात्र लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यू यामुळे त्यांना भीक मिळेनाशी झाली. दोन दिवसांपूर्वी या वृद्ध दाम्पत्यापैकी महिला अतिशय गलितगात्र अवस्थेत प्रवासी निवाऱ्यात पडून असल्याचे काही आशा सेविकांच्या लक्षात आले. त्या महिलेची आशा सेविका चौकशी करीत असतानाच त्या प्रभागाचे जि. प. सदस्य खोजराम मरस्कोल्हे योगायोगाने त्या ठिकाणी पोहोचले. मरस्कोल्हे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधला व रुग्णवाहिका बोलावून त्या वृद्धेस उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. नंतर जीवनोपयोगी वस्तूंची किट दिली.
दुसरी घटना नागभीड येथील आहे. नागभीड येथील जनता शाळेजवळील एका झाडाखाली एक व्यक्ती अशीच वास्तव्य करून आहे. मंगळवारी संध्याकाळी ती व्यक्ती निपचित पडून असल्याचे काही लोकांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती न.प.चे बांधकाम सभापती सचिन आकूलवार यांना दिली. आकूलवार यांनी लागलीच रुग्णवाहिकेद्वारे त्या व्यक्तीस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यास चंद्रपूरला हलविण्यात आले. या व्यक्तीवरही अन्न न मिळाल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असावी, असे बोलले जात आहे.