इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट जिल्ह्यासाठी चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST2020-03-21T06:00:00+5:302020-03-21T06:00:42+5:30
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूरचे जंगल अत्यंत समृद्ध आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली. वन्यजीव व जैवविविधतेमुळे जिल्ह्याचे नाव देशभरात पोहोचले. राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विकासाभिमुख धोरण परिणामकारक ठरले. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीला अनुकूल असलेला बांबूची हजारो हेक्टर क्षेत्रात लागवड झाली.

इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट जिल्ह्यासाठी चिंताजनक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात वन क्षेत्राचे प्रमाण वाढू लागल्याने त्यावर आधारित बांबू, तेंदूपत्ता आणि विविध मूल्यवर्धन प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. या निर्माणाधीन प्रकल्पांमधून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. बांबूवर आधारित अगरबत्ती प्रकल्पामुळे तर हजारो महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २०१९ च्या अहवालानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रात ३२ चौरस किमी घट झाल्याची माहिती पुढे आली. यासाठी अवैध वृक्षतोडीकडे झालेले दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूरचे जंगल अत्यंत समृद्ध आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली. वन्यजीव व जैवविविधतेमुळे जिल्ह्याचे नाव देशभरात पोहोचले. राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विकासाभिमुख धोरण परिणामकारक ठरले. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीला अनुकूल असलेला बांबूची हजारो हेक्टर क्षेत्रात लागवड झाली. शिवाय, देशभरातील विविध बांबू प्रजातींची लागवड करून अगरबत्ती व अन्य वस्तुनिर्मिती प्रकल्पांची व्याप्ती वाढविली जात आहे. जागतिक कीर्तीचे चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेने बांबू व्यवसायावर आधारित विविध अभ्यासक्रम सुरू केले. परंतु, पर्यावरणाचा ºहास व वृक्षांचे प्रमाण कमी होऊ लागल्याने पर्यावरणावर अनिष्ट परिणाम झाले. त्यामुळे इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २०१९ चा अहवाल पर्यावरण प्रेमींना अस्वस्थ करणारा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ४८३२.१८ चौरस किमी वन क्षेत्र आहे. इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्टनुसार त्यामध्ये ३२ चौरस किमी वन क्षेत्राची घट झाली.
३३ कोटी वृक्ष लागवडीत जिल्ह्यातील नागरिक, पर्यावरण संवर्धनाविषयी बांधिलकी जोपासणाऱ्या विविध संघटनांनी लक्षवेधी योगदान दिले. मात्र, वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाने दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील वनक्षेत्रात घट झाली आहे.
95कोटी वृक्ष जिवंत
३३ कोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत सन २०१७ मध्ये ४३ लाख ६१ हजार ५१६ रोपटी लावण्यात आली. त्यातील २५ लाख ७४ हजार २०० वृक्ष जगले. सन २०१८ मध्ये ७२ लाख ६६ हजार ७३८ रोपटी लावली. त्यातील ३४ लाख ४० हजार ९८ वृक्ष जगले. शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेत सन २०१९ मध्ये १ कोटी ७३ लाख ३६ हजार ८५३ वृक्ष जिवंत आहेत, अशी माहिती विभागीय वन अधिकारी कार्यालयाने दिली.
जिल्ह्यातील वनक्षेत्राचा तपशील
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ११४४३.०० एवढे चौरस किमी आहे. यामध्ये राखीव वनक्षेत्र ३९५०. ०५ चौकिमी, सरंक्षित ८७८. ७२ चौरस किमी, अवर्गीकृत ३. ४१ चौरस किमी वनक्षेत्राचा समावेश आहे. कोअर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, ताडोबा बफर, पश्चिम चांदा, मध्य चांदा आणि ब्रह्मपुरी वन विकासाचे एकूण भौगोलिक क्षेत्र १५७२. ३२ चौरस किमी असल्याचा अहवाल मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने दिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वन क्षेत्रात ३२ टक्के चौरस किमी घट झाल्याचे इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २०१९ च्या अहवालात जाहीर झाले. त्यामुळे वन विभागाने वन क्षेत्रात वाढ करण्यासाठी वृक्षतोडीला प्रतिबंध व वन जमिनीवरील अतिक्रमण थांबविण्याकरिता विशेष लक्ष दिले पाहिजे.
- दीपक दीक्षित, पर्यावरण अभ्यासक
4,357 वनहक्क पट्टे वाटप
वन विभागातंर्गत जिल्ह्यातील ४ हजार ३५७ लाभार्थ्यांना वनहक्क जमिनीचे पट्टे वाटप करण्यात आले. त्यामध्ये ३ हजार ८७२ वैयक्तिक तर ४८५ सामूहिक वनहक्क दाव्यांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियमानुसार आतापर्यंत १ लाख ३३ हजार ३८३.५४ एकर जमीन गावांना वाटप करण्यात आली. सद्यस्थितीत २२६ वैयक्तिक दावे पुनर्विलोकनाच्या प्रतीक्षेत आहेत. ३ हजार ७५ गावांची जमीन मोजणी करून सातबारा वाटप केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.