क्षेत्राच्या विकासासाठी वचनबद्ध- सुधीर मुनगंटीवार
By Admin | Updated: October 3, 2014 01:25 IST2014-10-03T01:25:15+5:302014-10-03T01:25:15+5:30
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. मा.सा. कन्नमवार यांचे स्मारक त्यांची कर्मभूमी असलेल्या मूल शहरात उभारण्यासाठी विधानसभेच्या..

क्षेत्राच्या विकासासाठी वचनबद्ध- सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. मा.सा. कन्नमवार यांचे स्मारक त्यांची कर्मभूमी असलेल्या मूल शहरात उभारण्यासाठी विधानसभेच्या माध्यमातून मी संघर्ष केला. कर्मवीर मा.सा. कन्नमवार काँग्रेसचे नेते होते म्हणून त्यांचे स्मारक का उभारायचे असा विचार मी कधीही केलेला नाही. कर्मवीर कन्नमवार थोर नेते होते, आमच्यासाठी ते आदर्श आहेत. ही त्या मागील भावना होती. त्या महान लोकनेत्याला स्मारकाच्या माध्यमातून आदरांजली देण्याचा विचारही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या मनाला शिवला नाही. मात्र मी या संसदीय संघर्षाच्या माध्यमातून त्यांचे ५ कोटी रुपये किमतीचे स्मारक मूल शहरासाठी मंजूर करु शकलो, याचा मला मनापासून आनंद आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी गेल्या १५ वर्षात जनतेच्या सहनशिलतेचा अंत बघितला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातून हद्दपार करा, असे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा- रिपाई आ.- मित्रपक्ष युतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मूल शहरातील बाजार चौकात झालेल्या जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. मूल शहरातील मुख्य रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी १५ कोटी रुपये निधी मंजूर करविला, मूल नगर परिषदेच्या रौप्य वर्षानिमित्त शहरातील रस्ते बांधणीसाठी १० कोटी रुपयांचा निधी विशेष निधी मंजूर करविला, शहरात माळी समाजाच्या विद्यार्थी वसतिगृहासाठी ४५ लाख रुपये निधी राज्यसभा सदस्यांच्या खासदार निधीच्या माध्यमातून मंजूर करविला, एक कोटी रुपये खर्चून शहरात श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या निर्मितीचे काम प्रगतीपथावर आहे. शहरात १ कोटी रुपये खर्चून जलतरण तलावाची निर्मिती करण्यासाठी मी प्रयत्नशिल आहे. याशिवाय ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात विकासकामे आम्ही पुर्णत्वास आणली आहे. विकासप्रक्रियेत कधीही राजकारण न करता सर्वसमावेशक पद्धतीने विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगिन विकासासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बाजार चौक मूल येथे झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी मूलच्या नगराध्यक्षा रिना थेरकर होत्या. मंचावर जि.प. अध्यक्षा संध्या गुरुनुले, भाजपा नेते प्रमोद कडू, अनिल संतोषवार, नंदु रणदिवे, चंदुु मारगोनवार, माजी नगराध्यक्षा उषा शेंडे, मिलींद खोब्रागडे, लिना बद्देलवार, वर्षा चौधरी, कोकीळा गुरनुले, सपना भोयर, प्रशांत लाडवे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक भाजपा शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा रिना थेरकर, संध्या गुरनुले, प्रमोद कडू यांचीही समयोचित भाषणे झाली. संचालन न.प. उपाध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांनी केले. (शहर प्रतिनिधी)