पर्यायी पिकांबरोबरच ‘युवाग्राम’चा मेळ

By Admin | Updated: October 11, 2015 02:13 IST2015-10-11T02:13:47+5:302015-10-11T02:13:47+5:30

देशातील कृषीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन नवीन काही घेता येईल,

The combination of 'Yuvaagram' along with alternative crops | पर्यायी पिकांबरोबरच ‘युवाग्राम’चा मेळ

पर्यायी पिकांबरोबरच ‘युवाग्राम’चा मेळ

सोमनाथ प्रकल्प : ८ बंधारे, २४ तलाव, १९ विहिरी, युवकांना मिळाला रोजगार
राजू गेडाम मूल
देशातील कृषीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन नवीन काही घेता येईल, यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन नवा अविष्कार घडविण्याचा प्रयत्न सोमनाथ प्रकल्पात सुरू असतो. या सगळ्याचा परिणाम म्हणून सोमनाथ हे केवळ लोकसंख्येवर नव्हे तर दर्जा आणि नव्या प्रयोगांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील आदर्श शेती करणारे गाव ठरले आहे. शेतीवर भाताचे पीक न घेता पर्यायी पिके घ्यावीत. जेणेकरुन इतरत्र जावून भाजीपाला घ्यावा लागणार नाही. ही बाब हेरून पर्यायी पिकांची कल्पना साकारण्यात आली. या पर्यायी पिकांबरोबरच मेळ साधला गेला बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी ‘युवाग्राम’ चा. यामुळे बेरोजगार युवकांना स्वत:च्या पायावर आत्मनिर्भर राहण्याचा नवा आत्मविश्वास ‘सोमनाथ’ मधून मिळाला.
सोमनाथ येथे पाणी अडवून बंधारे बांधल्या गेल्याने पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात झाली. यातून धान्य पिकाबरोबरच पर्यायी पिकांची लागवड केल्या गेली तर सोमनाथ येथे वास्तव्य करणाऱ्यांना भाजीपाला व इतर बाबीसाठी बाहेर जावे लागणार नाही, हे हेरुन भाजीपाला व इतर फळभाज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात विविध पालेभाज्या व फळभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. गरजेएवढा भाजीपाला प्रकल्पात ठेऊन शिल्लक भाजीपाला बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्यात येतो. यामुळे भाजीपाला उत्पादनासोबतच आर्थिक उत्पन्नातदेखील वाढ झाली. पर्यायी पिकांत गहू, हरबरा, तूर, हळद, उस तसेच इतर पिकाची लागवड केल्याने सोमनाथ हे सर्वसपन्न ठिकाण संबोधल्या जाऊ लागले. धानाचे उत्तम पीक, त्यानंतर पर्यायी पिकातून आलेले यश बघता, परिसरातील बेरोजगार युवकांना शेतीचा अभ्यास करुन आपआपल्या गावात अनुकरणातून शिकता यावे, यासाठी ‘युवाग्राम’ म्हणून प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सन १९९५ पासून ‘युवाग्राम’ यातून परिसरातील दहावी, बारावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आजही केला जातो. सोमनाथ येथे विद्यार्थ्यांना जेवणाबरोबर राहण्याचीसुद्धा सोय केली जाते. सोमनाथमधील निरनिराळ्या कामांमध्ये सामावून घेण्यात येते. यात ही मुले शेती, डेअरी, इलेक्ट्रीशियन, फॅब्रिकेशन तसेच शेतीच्या उपकरणांच्या दुरुस्ती व देखभालीचे कामदेखील दिल्या जाते. येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर इतरत्र मारुन आपला स्वत:चा व्यवसाय करण्यास ते सक्षम बनलेले असतात. शासन सर्वांनाच नोकरी देणे शक्य नसल्याने सोमनाथ येथे होत असलेल्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला तर स्वत:च्या पायावर आत्मनिर्भर राहण्याचा आत्मविश्वास नक्कीच निर्माण होताना दिसून येतो.
सोमनाथ येथे पुरक व्यवसायाला जोड दिली आहे, ती पशुपालन, शेळीपालन व मत्स्यपालनाची. आजच्या स्थितीत पशुपालनावर दुग्ध उत्पादनाचा उच्चांक गाठला गेला आहे. शेळीपालन यशस्वी झाले असून शेळ्या व बोकडांची विक्री देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यात विशेष म्हणजे मत्स्यपालन प्रकल्प सोमनाथ येथे यशस्वी झाला असून लाखो रुपयांचे मासे विक्री केले जात आहेत. मत्स्यपालन संस्थानाच ते देत असल्याने वर्षभर मासे पकडून विक्रीसाठी दूरपर्यंत नेले जातात. सोमनाथ येथे विविध पिकांबरोबर व्यवसायाभिमुख शेळी, मत्स, पशु पालनावर भर दिल्याने हा व्यवसाय देखील येथे यशस्वी होऊ शकतो ही प्रेरणा इतरांना देता येऊ लागली आहे. याच बरोबरच १० व १२ च्या विद्यार्थ्यांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न येथे करण्यात येत आहे. बेरोजगार युवकांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न येथे होताना दिसत आहे.

Web Title: The combination of 'Yuvaagram' along with alternative crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.