कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी चार केंद्रांवर आज रंगीत तालिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST2021-01-08T05:34:02+5:302021-01-08T05:34:02+5:30
राजेश मडावी चंद्रपूर : येत्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची १०० टक्के यशस्विता तपासून पुढील नियोजनासाठी शुक्रवारी ...

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी चार केंद्रांवर आज रंगीत तालिम
राजेश मडावी
चंद्रपूर : येत्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची १०० टक्के यशस्विता तपासून पुढील नियोजनासाठी शुक्रवारी जिल्ह्यात रंगीत तालिम म्हणजे ‘ड्राय रन’ करण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हा आरोग्य प्रशासन व चंद्रपूर महानगर पालिकेतील २० जणांचे प्रशिक्षित पथक सज्ज झाले. प्रत्यक्षात लस कुणालाही दिली जाणार नाही. मात्र, लाभार्थी म्हणून प्रत्येक केंद्रात पाच याप्रमाणे चार केंद्रांमध्ये १०० जणांवर (नमुने) अचूक प्रात्यक्षिक करण्यासाठी आरोग्य प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे.
केंद्र सरकारच्या केंद्रीय ड्रग्ज कंट्रोलर जनरलने भारतातील सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेले कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सीन या दोन स्वदेशी लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. त्यामुळे केद्र सरकारच्या आदेशानुसार पुणे, नागपूर, जालना व नंदूरबार जिल्ह्यांमध्ये २ जानेवारी कोरोना लशीची ‘ड्राय रन’ करण्यात आली होती. आता राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातही शुक्रवारी लसीकरणाची रंगीत तालिम होणार आहे. यासाठी आरोग्य प्रशासनाने चार केंद्र निश्चित केले आहे.
रंगीत तालिम म्हणजे काय ?
ड्राय-रन हा रंगीत तालिमप्रमाणे सराव आहे. लसीकरण मोहीम कशी राबवावी, त्यासाठीची पूर्वतयारी, संभाव्य अडचणी, त्यावरचा उपाय याबाबत प्रात्यक्षिक होणार आहे. याचा एक डेटाबेस तयार होईल. अंतिम टप्प्यात को-विन या अप्लिकेशनवर अर्ज भरून नागरिकांची नोंदणी केली जाईल.
जिल्ह्यातील चार केंद्र कोणते ?
चंद्रपूर महानगर पालिका आरोग्य विभाग अंतर्गत रामनगर आरोग्य केंद्र, दुर्गापूर झोन क्रमांक दोन, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वरोरा उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी ‘ड्राय रन’ करण्यात येणार आहे.
असे होईल लसीकरण
लसीकरण केंद्रात वेटींग, व्हॅक्सीन व ऑब्झर्व्हर, असे तीन कक्ष राहणार आहेत. तीन कक्षासाठी पाच जणांचे प्रशिक्षित आरोग्य पथक सेवा देणार आहे. पहिल्या कक्षात लस घेणाऱ्या व्यक्तीची खात्री करून को-विन ॲपमध्ये नाव नोंदणी होईल. त्यानंतर दुसऱ्या कक्षात लसीकरण आणि लस घेतल्यानंतर संबंधिताला तिसऱ्या कक्षात ३० मिनीट निरीक्षणाखाली ठेवले जाते.
कोट
‘ड्राय रन’ मुळे ‘मॉकड्रील’ प्रमाणे ग्राऊंड लेव्हलवरील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी सक्षमपणे कर्तव्य बजावतील, हा यामागील हेतू आहे. प्रत्यक्षात कुणालाही लस दिली जाणार नाही.
-आविष्कार खंडारे, वैद्यकीय अधिकारी, महानगर पालिका, चंद्रपूर