जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र साडेतीन महिन्यांनंतर सरपंचाच्या हातात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:27 IST2021-04-11T04:27:28+5:302021-04-11T04:27:28+5:30
नागभीड : स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत दिलेल्या निकालास स्थगिती देऊन स्पर्धेत असलेल्या गावांचे फेरमूल्यमापन करण्यात यावे, अशा आशयाचे जिल्हाधिकारी ...

जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र साडेतीन महिन्यांनंतर सरपंचाच्या हातात
नागभीड : स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत दिलेल्या निकालास स्थगिती देऊन स्पर्धेत असलेल्या गावांचे फेरमूल्यमापन करण्यात यावे, अशा आशयाचे जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना २३ डिसेंबर, २०२०ला लिहिलेले पत्र तक्रारकर्त्या सरपंचांना तब्बल साडेतीन महिन्यांनंतर मिळाले आहे.
दरम्यानच्या काळात फेरमूल्यांकनाबाबत काय प्रक्रिया झाल्या, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
तालुक्यातील कोटगाव या गावाने जिल्हास्तरीय आदर्श स्मार्ट गावाच्या संपूर्ण अटी पूर्ण केल्या. स्पर्धेत असलेल्या संपूर्ण गावांच्या तुलनेत हे गाव तसूभर पुढेच होते. मात्र, राजकीय दबावापोटी दुसऱ्याच गावास पहिल्या क्रमांकाची पसंती देण्यात आली होती. हा कोटगाव या गावावर अन्याय असून, पुन्हा मूल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी माजी सरपंचासह गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन केली होती. फेरमूल्यांकन न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला होता.
१९५६ मध्येच आदर्श गावाची पताका फडकावणाऱ्या कोटगावने गेल्या काही वर्षात आदर्श ग्राम योजनेत अनेकदा सहभाग घेतला व पुरस्कारही प्राप्त केले. लोक सहभागाच्या बाबतीत हे गाव नेहमीच अग्रभागी राहिले आहे. गावात कोणताही सामुदायिक कार्यक्रम असो, या गावाने कधीच पाय मागे घेतले नाही. या वर्षीही जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम स्पर्धेत भाग घेतला आणि या गावात वेगळाच हुरूप निर्माण झाला.
बॉक्स
सर्व अटी केल्या पूर्ण
स्मार्ट ग्रामच्या ज्या काही अटी, नियम आहेत, त्या अटी नियमांची पूर्तता करण्यासाठी या गावाने कंबर कसली आणि लोकसहभागाने कोटगाववासीयांनी अनेक कामे पूर्ण केली.
मूल्यांकनासाठी आलेले अधिकारी गावात आले. गावाची तपासणी केली, पण माहितीपत्रक घेऊन गेले नाही. कागदपत्रांची पूर्तता करा, आपले गुण नक्कीच वाढतील, असा सल्लाही या अधिकाऱ्यांनी दिला. या स्मार्ट ग्राम स्पर्धेचा निकाल आला, तेव्हा गावकऱ्यांना चांगलाच धक्का बसला. कारण निवडीत कोटगावला वगळण्यात आले होते. या अन्यायाविरोधात १० डिसेंबर, २०२० रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.
कोट
स्मार्ट ग्राम निवडीत कोटगाववर झालेल्या अन्यायाची तक्रार मी १० डिसेंबर, २०२०ला जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. २३ डिसेंबर, २०२०ला जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यासंबंधी काही सूचना दिल्याचे पत्रावरून दिसून येते. मात्र, मला या सूचना ९ एप्रिलला प्राप्त झाल्या. स्मार्ट ग्राम फेरमूल्यांकनाबाबत मधल्या काळात काय प्रक्रिया झाल्या, याबाबत मी व गावकरी अनभिज्ञ आहोत.
- यशवंत भेंडारकर, तक्रारकर्ता व विद्यमान उपसरपंच, कोटगाव