वेकोलितील कोळसा वाहतुकीने कोरोनाचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST2021-04-24T04:28:23+5:302021-04-24T04:28:23+5:30
सास्ती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू आहे. राज्यात कडक लॉकडाऊन असले तरी ...

वेकोलितील कोळसा वाहतुकीने कोरोनाचा धोका वाढला
सास्ती
: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू आहे. राज्यात कडक लॉकडाऊन असले तरी वेकोलिच्या कोळसा खाणीत नियम धाब्यावर बसवून ट्रकचालक इकडे तिकडे बिनधास्त फिरत असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात कोविडची लागण होत आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शासनाने पुन्हा राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बाजारपेठा बंद आहे. परंतु अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली राजुरा तालुक्यातील सास्ती, गोवरी, पोवनी २, गोवरी डीप या वेकोलीच्या कोळसा खाणीत वाहतूक सुरू आहे. मात्र याठिकाणी वाहनचालक जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात तर परप्रांतातून कोळसा खाणीत येत असल्याने कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. वेकोलीच्या कोळसा खाणीत वाहनचालक घोळका करून बसत असल्याने याठिकाणी कोविड नियमांची ऐसीतैसी केली जात आहे. त्यामुळे वेकोलीच्या कोळसा खाणीतील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळे परिसरातील गावांना कोरोना संसर्गाची लागण होण्याची शक्यता बळावली आहे. मात्र यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने कोळसा खाणीत कोरोना बाधितांची संख्या वाढली असून कोरोनामुळे कामगारांचा मृत्यूही झाला आहे.