मंगल जीवने
बल्लारपूर : मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत ३५ कोटींच्या ग्रीड पाणीपुरवठा योजनेला मागील साडेतीन वर्षांपासून ग्रहण लागले असून, येणाऱ्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही योजना कधी सुरू होणार, असा प्रश्न १८ गावांतील नागरिकांनी केला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत या योजनेचे काम होत असून, चौपदरी रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने रस्त्याचा बाजूने लावारी ते कळमनापर्यंत अडीच किलोमीटर गेलेली पाइपलाइन तोडल्यामुळे मागील नऊ महिन्यांपासून ग्रीड पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के.आर. घोडमारे यांनी नुकसान झालेल्या अंदाजपत्रकासह तोडफोड केल्याचे छायाचित्र कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली यांना पाठविले आहे. या कामाच्या दुरुस्तीबाबत लेखी कळवूनही या विभागाकडून अद्याप कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, तोडफोड केलेल्या कामाची नुकसानभरपाई ७५.१६ लाख द्यावी किंवा त्वरित दुरुस्ती करून देण्यात यावी, असे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना देऊनसुद्धा या विभागाने मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
बॉक्स
या गावांना होणार फायदा
या योजनेचा फायदा नांदगाव पोडे, हडस्ती, चारवट, विसापूर, चुनाभट्टी, भिवकुंड, बामणी, केम तुकूम, दुधोली, दहेली, लावारी, कळमना, जोगापूर, कोर्टी तुकूम, कोर्टी मक्ता, पळसगाव, किन्ही आणि कवडजई या १८ गावांतील ३१ हजार ८५२ नागरिकांना होणार आहे. या कामाचा कार्यादेश २० एप्रिल २०१७ ला देण्यात आला आहे. कामाची मुदत १८ महिन्यांची होती. या अवधीत काम न झाल्यामुळे २०१८ ला पुन्हा १८ महिने मुदत वाढविण्यात आली; परंतु साडेतीन वर्षांचा कालावधी उलटूनही १८ गावांच्या नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
कोट
या योजनेची किरकोळ कामे वगळता आवक विहीर, जोडनलिका, निरीक्षण विहितीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत व इतर कामे प्रगतिपथावर आहेत. पाइपलाइनची दुरुस्ती झाल्यानंतर पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येईल.
-गोपाल कटके, सहायक अभियंता, मजीप्रा, उप विभाग, बल्लारपूर
170921\20210917_120918.jpg
पावर हाऊस जवळील पाणी पुरवठा योजना