वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेला स्पष्ट बहुमत
By Admin | Updated: March 9, 2016 02:03 IST2016-03-09T02:03:36+5:302016-03-09T02:03:36+5:30
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेला स्पष्ट बहुमत
वरोरा : वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. शिवसेनेने ही निवडणूक प्रथमच लढवित १८ जागांपैकी १४ जागांवर आपले संचालक निवडून आणत आजपावेतो काँग्रेस व भाजपाच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीवर शिवसेनेने कब्जा मिळविला आहे. या निमित्ताने सहकार क्षेत्रात शिवसेने वरोरा तालुक्यात प्रथमच प्रवेश केला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस, भाजपा व शिवसेना या पक्षानी प्रतिष्ठेची करीत राजकीय पक्षांनी आपले १८ ही जागेवर उमेदवार उभे केले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक वर्षे इंदिरा काँग्रेसच्या ताब्यात राहिली. काही वर्षे शेतकरी संघटनेनेही आपल्या ताब्यात घेतली होती. इंदिरा काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर काही महिने बाजार समितीवर भाजपाच्या संचालकांनी ताबा घेतला होता. बाजार समितीच्या ६ मार्च रोजी १८ जागांकरिता मतदान घेण्यात आले. त्याचा निकाल ७ मार्च रोजी वरोरा शहरातील नगरभवनमध्ये जाहीर करण्यात आला. त्यात शिवसेनेचे सेवा सहकारी गटातून दत्ता बोरेकर, अशोक सोनटक्के, राजू आसुटकर, संजय घागी, योगेश खामनकर, बंडू शेरकी, किशोर भलमे, संगीता ठाकरे, ग्रामपंचायत गटातून राजेंद्र चिकटे, देवानंद मोरे, हरिदास जाधव, विशाल बदखल, व्यापारी अडतेमधून निरज गोठी, चंद्रकुमार जयस्वाल तर काँग्रेसचे डॉ. विजय देवतळे, गुणवंत भोयर, सुनंदा जीवतोडे विजयी झाले. हमाल मापारी मतदार संघातून पांडूरंग झाडे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ १५ झाले आहे. आ. बाळू धानोरकर यांच्या नेतृत्त्वात वरोरा शहरातून रॅली काढण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)