ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 00:52 IST2017-05-15T00:52:36+5:302017-05-15T00:52:36+5:30
चंद्रपूर म्हटले की ताडोबा हे एक नाव डोळ्यापुढे येते. मात्र, गोंड साम्राज्याची वैभवशाली खूण असलेला येथील पराकोट, किल्ला मात्र उपेक्षित राहतो.

ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता सुरूच
प्रेरणादायी उपक्रम : इको-प्रोची अविरत स्वच्छता मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर म्हटले की ताडोबा हे एक नाव डोळ्यापुढे येते. मात्र, गोंड साम्राज्याची वैभवशाली खूण असलेला येथील पराकोट, किल्ला मात्र उपेक्षित राहतो. इको प्रो. नामक एका युवा संघटनेने ५५० वर्षे जुन्या किल्ल्यांची स्वच्छता मोहीम गेल्या ६८ दिवसांपासून अविरत सुरू ठेवली आहे. आपला इतिहास लख्ख स्वरूपात पुढे यावा, यासाठी नव्या पिढीची धडपड प्रेरणादायी ठरत आहे.
चंद्रपूर शहर म्हणजे गोंडराजांची राजधानी. ५५० वर्षे जुन्या या राजधानीला ७ किलोमीटरचा भूईकोट किल्ला लाभला आहे. मात्र, लोकांच्या अनास्थेमुळे हा भुईकोट किल्ला नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. इको प्रो या संस्थेच्या गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या श्रमदानातून या किल्ल्यास नवीन रूप मिळत आहे. चार भव्य दरवाजे, पाच खिडक्या, ३८ बुरुज आणि ७ किलोमीटर लांबीचा परकोट शहरात आहे. याच या भुईकोट किल्ल्यात गोंडराजांनी चंद्रपूर ही आपली राजधानी वसवली आणि जवळपास ३०० वर्षे राज्य केले. मात्र, हा ऐतिहासिक वारसा आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. चंद्रपुरातील युवांचा समावेश असलेल्या इको प्रो. नामक स्वयंसेवी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला साद देत हा ऐतिहासिक वारसा लख्ख स्वरूपात पुढे आणण्याचा चंग बांधला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून इको प्रो. या संस्थेचे ४० कार्यकर्ते अविरत परिश्रम करून शहरातील किल्ले आणि परकोट स्वच्छ करीत आहेत. कार्यकर्त्यांच्या या मेहनतीमुळेच आज किल्ल्यांना नवीन रूप मिळाले आहे. ६८ दिवसांआधी दिसणारा परकोट आज अगदी थक्क करणाऱ्या स्वरूपात लोकांपुढे आला आहे. भुईकोट किल्ला ताडोबाहून अधिक पर्यटक खेचून आणू शकतो. याकडे आजवर दुुर्लक्ष झाले. कधीकाळी या साडेसात किमी परकोटाची देखभाल आणि संरक्षण घोडदळाद्वारे केले जायचे, हे ऐकूनही खरे वाटत नाही. मात्र, आपल्या इतिहासाची माती करण्यात आपण सर्वच आघाडीवर असल्याचा इतिहास असल्याने चंद्रपूरच्या परकोटाचे व्हायचे तेच झाले. मात्र, या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व ओळखून राबविण्यात येणारे स्वच्छता अभियान ६९ व्या दिवसांत प्रवेशले असल्याने आतातरी नागरिक, प्रशासन आणि पुरातत्व खात्याने डोळे उघडावे, अशी कळकळीची अपेक्षा इको-प्रोच्या युवकांनी व्यक्त केली.