Citizens unemployed due to partner's illness | साथीच्या आजाराने नागरिक बेजार

साथीच्या आजाराने नागरिक बेजार

ठळक मुद्देवातावरणात बदल : उबदार कपड्यांची मागणी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून वातावरण सातत्याने बदलत आहे. कधी थंडी तर कधी कोरड्या वाऱ्यांमुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात व्हायरल फीवर आणि सर्दी-खोकल्यांच्या तक्रारी वाढल्या असतानाच साथीचे आजारही वाढत आहेत. घरोघरी सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण आढळून येत आहे. परिणामी, शासकीय रुग्णालयासह खासगी दवाखानेही फुल्लं झाले आहेत. अनेक नागरिकांची दिवाळीही आजारपणातच गेली.
वातावरणात सतत बदल होत असताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. लहान बालके, वृद्ध व रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना आजाराची लवकर लागण होते. रात्री थोडी थंडी व दिवसा उकाडा, त्यातच अधून मधून पावसाच्या सरी अशा वातावणामुळे साथीचे आजार बळावत आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजारातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहावयास मिळते. आधीच श्वसनाचे विकार असणाºया व्यक्तींना या वातावरणाचा अधिक त्रास होतो. गावागावांतील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये व खासगी दवाखाने रुग्णांच्या संख्येमुळे भरल्याचे चित्र आहे.
सर्दी-पडसा, खोकला व त्यामुळे आलेल्या तापावर वेळीच उपचार न केल्यास ताप वारंवार येतो. परिणामी, अनेकदा रुग्णांना जीवही गमवावा लागतो. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. यासाठी आरोग्याप्रती जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.
मागील काही दिवसांपासून व्हायरल फिवरने कहर केला आहे. प्रत्येक घरातील बालके आजारी दिसून येत आहे. सर्दी, खोकला, ताप आणि घसा दुखत असल्याने चिमुकल्यांची त्राही होत असल्याचे दिसते. ग्रामीण भागातही विविध आजारांची डोके वर काढले असून नागरिक जेरीस आले आहेत.

मच्छरदाणीत झोपणे फायद्याचे
या वातावरणात मच्छरांची उत्पत्ती अधिक होते. त्यामुळे डासांपासून बचाव व्हावा यासाठी मच्छरदाणीत झोपणे फायद्याचे ठरते. सर्दी, पडसा, खोकला झाल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्लाने औषधोपचार करावा.

त्वचा कोरडी व्हायला सुरुवात
थंडीमध्ये कोरडी हवा श्वासोच्छवासाद्वारे आत जाते व याचा परिणाम फुफ्फुसावर होतो. थंडीमुळे घसा खवखवणे, घशाचा संसर्ग असे आजार होतात. यापासूनच श्वसनाच्या आजाराची सुरुवात होते. दम्याच्या रुग्णांना या वातावरणाचा अधिक त्रास होतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. नियमित फिरायला जाणे, व्यायाम करणे, एकाच वेळी न खाता थोडे-थोडे चार ते पाच वेळा खाणे, रोज तीन ते चार लिटर पाणी पिणे, रोज एक फळ वा सुका मेवा खाणे आवश्यक असल्याचे डॉक्टरचे म्हणणे आहे. अधिक वेळा उपाशी राहणे या काळात अपायकारक ठरते. यामुळे नियमित सकस आहार घ्यावा तसेच हात, पाय स्वच्छ धुण्याच्या सूचनाही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या आहे.

Web Title: Citizens unemployed due to partner's illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.