रस्त्यांच्या दुरवस्थेने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST2021-03-14T04:25:24+5:302021-03-14T04:25:24+5:30
नालीअभावी सांडपाणी रस्त्यावर सिंदेवाही : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. काही नागरिकांनी आपल्या घरातील ...

रस्त्यांच्या दुरवस्थेने नागरिक त्रस्त
नालीअभावी सांडपाणी रस्त्यावर
सिंदेवाही : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. काही नागरिकांनी आपल्या घरातील सांडपाणी मुख्य नालीत जाण्यासाठी मार्ग तयार केला नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आले आहे. ग्रामपंचायतींना ही कामे पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली.
गडचिरोली मार्गावर गतिरोधकाची मागणी
सावली : सावली ते गडचिरोली मार्गावरील मोठ्या गावांच्या मुख्य चौकात गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. खेडी ते चकपिरंजी या रस्त्यावर तर एकही गतिरोधक नाही. त्यामुळे यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. बांधकाम विभागाने या रस्त्यावर गतिरोधक तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सहा महिन्यांपासून पथदिवे बंद
विसापूर : जिल्हा परिषदअंतर्गत लावण्यात आलेले विसापुरातील पथदिवे मागील सहा महिन्यांपासून बंद आहेत. संबंधित विभागाने पथदिवे सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
खड्ड्यांमुळे वाढले मणक्याचे आजार
जिवती : तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवास करताना विविध अडचणी येतात. यातच विविध आजार वाढले आहेत. याकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरूस्ती करणे गरजेचे आहे.
चनाखा-सातरीतील रस्ता मोकळा करा
राजुरा : तालुक्यातील चनाखा-सातरी शिवधुऱ्यावरुन वहीवाट आहे. देवीदास मून, रमेश लोखंडे, राघोबा मून, नानाजी मोरे, नत्थू बोबडे यांचा मार्ग बंद करून त्यांना त्रास दिल्या जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देविदास मून यांनी केली आहे.
दहा वर्षांपासून कोडशी बु. चे पुनर्वसन रखडले
कोरपना : पूरबाधित कोडशी बु गावाच्या पुनर्वसनासाठी दहा वर्षांपूर्वी वणी मार्गावर जमीन आरक्षित करण्यात आली. मात्र यातील प्लॉट अद्यापही वाटप करण्यात न आल्याने तसेच सोयी-सुविधा पुरविण्यात न आल्याने पुनर्वसन रखडले आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.
ब्रह्मपुरीत कृषी महाविद्यालयाची गरज
ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील शैक्षणिक नगरी म्हणून ओळख असलेल्या ब्रह्मपुरी शहरात दूरवरून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. येथे कला, वाणिज्य, विज्ञान पदवी पदव्युत्तर महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, फार्मसी कॉलेज आदी शैक्षणिक संस्था आहेत. मात्र कृषी महाविद्यालय नसल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना नागपूर किंवा वरोरा येथे शिक्षणासाठी जावे लागते. त्यामुळे येथे कृषी महाविद्यालय स्थापन करावे, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून केली जात आहे.
मूल-गडचिरोली रेल्वे मार्ग करा
मूल : येथून गडचिरोलीसाठी नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासोबत रेल्वे मार्गाने जोडले जाईल. पर्यायाने येथील बाजारपेठेला चालना मिळेल. त्यामुळे मूल ते गडचिरोली रेल्वे मार्ग होणे गरजेचे आहे.
स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा
सिंदेवाही : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी घातली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेक युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़; मात्र कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची अडचण मोठी वाढली आहे.
स्त्रीरोग तज्ज्ञाची नियुक्ती करावी
कोरपना : येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ नसल्याने महिला रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथे स्त्री रोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे. येथील रुग्णालयात परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने येत असल्याने गर्दी असते.
आधार कार्डसाठी केंद्र सुरू करावे
सिंदेवाही : तालुक्यात आधार कार्ड काढण्याची सुविधाच नसल्याने नागरिकांची पायपीट सुरू आहे. कार्ड नसल्याने शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येत आहेत.
रस्त्याच्या बाजूला खताचे ढिगारे
नागभीड : तालुक्यातील अनेक गावांत म्हैशी व गाय मालकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात खत साठविले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होण्याची भीती आहे.
सांडपाणी अडल्याने आरोग्य धोक्यात
सिंदेवाही : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
पाणी पुरवठ्याकडे लक्ष देण्याची मागणी
कोरपना : तालुक्यातील अनेक गावातातील जलकुंभ शोभेच्या वास्तू ठरल्या. पाणी पुरवठा योजना मंजूर असतानाही कामेच सुरू झाली नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यावर होत आहे.
वन्यप्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त
चिमूर : रानडुकरांच्या हैदोसाने वन परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. रानडुकरांचा कळप शेतात घुसून पिकांची नासधूस करीत आहेत. शेतकरी वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी रात्री जागतात; मात्र कळपाने येणाऱ्या वन्य प्राण्यांना हुसकावणे कठीण होत आहे.
स्वच्छता मोहीम करण्याची मागणी
गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम सुरू आहे. मात्र काही उपद्रवी नागरिकांमुळे तालुक्यात योजनेचा बोजवारा उडताना दिसून येत आहे. त्यामुळे स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली.
वरोरा मार्गावरील डोंगरगाव रस्त्याची दैना
वरोरा : वरोरा मार्गावरील डोंगरगाव, दहेगाव ते निमसडा पाटीपर्यंत रस्त्याचे दुरवस्था झाली आहे. त्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्या रस्त्यावर पडलेले खड्डे न बुजविल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी चिकणी, बोपापूर, डोंगरगाव, दहेगाव, मोहबाळा येथील नागरिकांनी केली.
जळाऊ लाकूड उपलब्ध करून द्यावे
सावली : जंगल परिसरात असणारे ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांचा उपयोग करतात; पण वनकायद्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. हा प्रश्न सोडविण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.