अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST2021-01-02T04:24:14+5:302021-01-02T04:24:14+5:30
बल्लारपूर : येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून नळयोजनेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पाणी मुबलक असतानाही मागील एक ते ...

अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
बल्लारपूर : येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून नळयोजनेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पाणी मुबलक असतानाही मागील एक ते दीड महिन्यापासून येथील नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे.
त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. अनेकवेळा मजुरीही बुडत आहे. त्यामुळे येथील पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी संत गाडगेबाबा जनसेवा समितीने केली आहे. यासंदर्भात त्यांनी लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाला निवेदन दिले आहे.
बलारपुरात कामगार, मजुरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कामावर गेल्याशिवाय या मजुरांना पर्याय नाही. मात्र, मागील एक ते दीड महिन्यापासून येथे अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे अनेकवेळा मजुरांची मजुरी बुडत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा केला जात असतानाही याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही उपाययोजना करण्यात आली नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी संत गाडगेबाबा जनसेवा समिती बल्लारपूरचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, माजी मंत्री, तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार, नगराध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हाधिकारी, जिल्हा प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे.