केरोसीनअभावी नागरिकांंना अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:48+5:30
देशात प्रदूषणमुक्त वातावरण राहावे, चुलीमुळे धूर पसरुन महिलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. लाखो महिलांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना कार्यान्वित करुन घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचविला. पण यामुळे केरोसीनवर बंदी घालण्यात आली.

केरोसीनअभावी नागरिकांंना अडचण
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दारिद्र्यरेषेखालील जनतेचे जीवनमान सुधारावे, या उद्देशाने शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा मोठा गाजावाजा करण्यात येतो. मात्र, अनेक योजना बंद करण्यात आल्या आहे. त्यातच शिधापत्रिकेवर मिळणारे केरोसीन बंद झाल्याने घराघरांत जळणारा दिवा, कंदील नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
देशात प्रदूषणमुक्त वातावरण राहावे, चुलीमुळे धूर पसरुन महिलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. लाखो महिलांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना कार्यान्वित करुन घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचविला. पण यामुळे केरोसीनवर बंदी घालण्यात आली. गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले असल्याने शेवटी गरीब जनता सरपण गोळा करुन स्वयंपाक शिजिवत असल्याचे चित्र दिसत असल्याने सदर योजना फोल ठरल्याचे दिसून येत आहे. सरपण पेटविण्यासाठी केरोसीनची आवश्यकता आहे. केरोसीन मिळविण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. सध्या धानाची कापणी, मळणी सुरु आहे. खेडेगावात शेतकरी शेतात जागल करण्यासाठी केरोसीनचा दिवा, कंदीलचा वापर करतात. मात्र, केरोसीन बंदीमुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या थोडी हवा जरी आली तरी महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा बंद केला जातो. त्यामुळे खेड्यातील जनतेला वीज येईपर्यंत अंधाराचा सामना करावा लागतो. केरोसीन बंदीमुळे दिवा, कंदीलचा उपयोग होताना दिसत नाही. शेतीच्या कामाकरिता शेतकऱ्यांना अनुदानावर शेतीपयोगी यंत्र पुरविण्यात आले. त्यात काही यंत्र केरोसीनवर चालणारे आहे. मात्र, केरोसीन मिळत नसल्याने ते यंत्रदेखील धूळखात पडले आहेत. रात्रीच्या वेळेस दिवा कंदील घरात चालू असल्याने चोरीच्या प्रमाणातसुद्धा घट दिसून येत होती. मात्र, केरोसीन बंदीमुळे गरिबांच्या घरचा दिवा, कंदील नामशेष होत आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबातील नागरिकांना अडचणींना सामोर जावे लागत आहे.
सरण पेटविण्यासाठी केरोसीन मिळेना
अंत्यसंस्काराच्या वेळेस सरण पेटविण्यासाठी केरोसीनचा वापर केला जात होता. मात्र केरोसीनचा पुरवठा जवळपास बंदच केल्याने मृताच्या नातेवाईकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. केरोसीनऐवजी डिझेलचा वापर करतो म्हटल्यास ते परवडण्याजोगे नाही. त्यामुळे शासनाने केरोसीनचा पुरवठा पूर्ववत सुरु करावा, अशी मागणी केली जात आहे.