नागरिकांनो, मत हे दुधारी तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST2021-01-02T04:24:25+5:302021-01-02T04:24:25+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव गावागावात आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून हजारो नागरिक जनसेवेसाठी योगदान देत आहेत. ...

नागरिकांनो, मत हे दुधारी तलवार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव गावागावात आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून हजारो नागरिक जनसेवेसाठी योगदान देत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात ग्रामगीता ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. राष्ट्रसंतांनी भारतीय मतदारांना लोकशाहीची शिकवण दिली. मतदारांनी आपल्या एका अमूल्य मताची किंमत ओळखून निवडणुकीतील योग्य उमेदवाराची निवड करावी, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे ।
आपुल्या मनावरीच साचे।
एकेक मत लाख मोलाचे।
ओळखावे याचे महिमान।।
मत हे दुधारी तलवार।
उपयोग न केला बरोबर।
तरी आपलाची उलटतो वार।
निवडणूक नव्हे बाजार- चुणूक।
निवडणूक ही संधी अचूक।
भवितव्याची।।
निवडणूक जणू स्वयंवर।
ज्या हाती देणे जीवनाचे बागडोर।
त्यासी लावावी कसोटी सुंदर।
सावधपणे।।
सर्व मतदारांनी मतदानाच्या हक्काचे महत्त्व ओळखायला हवे. मताधिकारामुळे भारताची लोकशाही जिवंत राहू शकते. त्यासाठी योग्य व सक्षम उमेदवाराची निवड करावी. आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथातून केले आहे. मतदानाचा योग्य वापर न केल्यास भविष्यात संकटांचा सामना करावा लागेल, गावाची दुर्दशा होईल, गाव विकासापासून मागे पडले, असा इशाराही राष्ट्रसंतांनी मतदारांना दिला आहे.