बालरक्षक घेणार शाळाबाह्य मुलांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:54 IST2018-05-06T23:54:31+5:302018-05-06T23:54:51+5:30
कोणताही मुलगा शिक्षणापासून वंचित राहु नये, म्हणून शासन विविध उपक्रम राबवत आहे. आता शासनाने नवीन उपाययोजना आखली असून बालरक्षक शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार आहे.

बालरक्षक घेणार शाळाबाह्य मुलांचा शोध
राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : कोणताही मुलगा शिक्षणापासून वंचित राहु नये, म्हणून शासन विविध उपक्रम राबवत आहे. आता शासनाने नवीन उपाययोजना आखली असून बालरक्षक शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार आहे.
शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत स्थलांतरीत बालकांना शिक्षण देण्यासाठी तसेच शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. २०१६ मध्ये संपूर्ण राज्यात एकाच दिवशी अशा मुलांचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. तरीही आणखी काही मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे आढळून आल्याने शासनाने नवीन संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.
नव्या निर्णयानुसार मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत.
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दोन शिक्षकांची बालरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक शहर साधन केंद्रात पाच शिक्षकांवर ही जवाबदारी देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने नवीन वेबसाईड तयार केली असून त्यावर बालरक्षकांची माहिती देण्यात येणार आहे.
कुणालाही होता येणार बालरक्षक
बालरक्षक होण्यासाठी शासनाने कुठलीही अट लागू केलेली नाही. समाजातील कुठल्याही व्यक्तीस बालरक्षक म्हणून काम करणा येणार आहे. सदरील व्यक्तीने शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्याची माहिती एकत्र करायची आहे. त्यानुसार नजिकच्या शाळेत त्या बालकास प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
मुलांच्या विकासासाठी नवा उपक्रम
शाळाबाह्य बालक आढळल्यास त्याला जवळच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे बालकांचा विकास होणार आहे. तसेच शाळाचीही प्रगती होणार आहे. सन २०१६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात अनेक जिल्ह्यात शाळाबाह्य मुले असल्याचे आढळून आले होते. त्यांना जवळच्या शाळेत दाखल करण्यात आले होते.