चिचोलीचा मालगुजारी तलाव कुचकामी
By Admin | Updated: September 6, 2014 23:40 IST2014-09-06T23:40:06+5:302014-09-06T23:40:06+5:30
नलेश्वर सिंचन प्रकल्पाला लागुनच चिचोली माजी मालगुजारी तलाव आहे. या तलावाची सिंचन क्षमता १५० हेक्टरच्या जवळपास आहे. शेकडो एकर शेती ओलिताखाली असताना, तलावाची मात्र

चिचोलीचा मालगुजारी तलाव कुचकामी
मोहाळी (नलेश्वर) : नलेश्वर सिंचन प्रकल्पाला लागुनच चिचोली माजी मालगुजारी तलाव आहे. या तलावाची सिंचन क्षमता १५० हेक्टरच्या जवळपास आहे. शेकडो एकर शेती ओलिताखाली असताना, तलावाची मात्र दुरवस्था झाली आहे. तुरूंबाला लिकेज असून तलावातील पाणी नाल्याला वाहून जात आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम सिंचाई उपविभाग सिंदेवाही यांच्या अखत्यारितीत हा तलाव येत असून संबंधीत विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक वर्षांपासून तलावाचे तुरूंब पूर्णत: लिकेज आहे. तलावाचे पाणी तुरूंबातुन नाल्याला वाहुन जात आहे. त्यामुळे तलावात सिंचनाकरिता पाणीच राहत नाही. त्यामुळे धान शेती पाण्याअभावी मरण्याची शक्यता आहे. तलावाच्या मुख्य नहराचीही मोडतोड झाली आहे.
दुष्काळ निवारण्यासाठी व धान पिकाला संरक्षण देण्यासाठी ठिकठिकाणी मालगुजारी तलावाची निर्मीती करण्यात आली. नलेश्वर सिंचन प्रकल्पाच्या शेजारी हा मालगुजारी तलाव असुन या तलावाची ओळख चिचोली तलाव म्हणून आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या तलावाचे बांधकाम झालेले असुन या तलावाचे पाणी धान पिकाला दिले जाते. तलावाचे सिंचन क्षेत्र १५० हेक्टर आहे. हा तलाव जवळपास निर्मितीपासूनच दुर्लक्षित आहे. हा तलाव माजी माल गुजारी तलाव आहे किंवा नाही हे जिल्हा परिषदेच्या बांधकाम सिंचाई विभागाला माहीतही नव्हते. या संबंधित विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे मुख्य पाळीला पूर्णत: जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे या तलावाच्या मुख्य पाळीने सहजासहजी जाता येत नाही. तर तलावाचे तुरूंब पूर्णता लिकेज व फुटून असल्याने पाणी नाल्याला वाहुन जात असते. मुख्य नहर पूर्णत: मोळकळीस आल्याने मालगुजारी तलावाची अत्यंत दयनिय अवस्था आहे.
यावर्षी अपुरा पाऊस व दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे. धान पीक करपली आहेत. तर अनेकांची रोवणी झालेली नाही. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असुन कर्जाच्या दलदलीत आहे. अनेक तलावाचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत नूतनीकरण करण्यात आले. मात्र चिचोली माजी मालगुजारी तलावाची अत्यंत बिकट अवस्था असतानादेखील जिल्हा परिषदेच्या बांधकाम सिंचाई विभागाने अनेक वर्षांपासून याकडे लक्ष दिले नाही. वास्तविक पाहता १५० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या तलावाचे नूतनीकरण झाले असते तर, शेतकऱ्यांना सिंचनासाठीपाणी मिळाले असते.