निवडणूक प्रक्रियेतील सर्वांचीच कोरोना तपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:23 IST2021-01-02T04:23:50+5:302021-01-02T04:23:50+5:30
पुरोगामी शिक्षक संघटनेचे निवेदन : जिल्हा प्रशासनाला निवेदन चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणूक २०२१ साठी जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना मतदान ...

निवडणूक प्रक्रियेतील सर्वांचीच कोरोना तपासणी करा
पुरोगामी शिक्षक संघटनेचे निवेदन : जिल्हा प्रशासनाला निवेदन
चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणूक २०२१ साठी जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर कार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी मतदान केंद्राध्यक्ष व केंद्र अधिकाऱ्यांच्या आर.टी.पी.सी.आर. टेस्ट करण्याच्या सूचना व वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाची भीती लक्षात घेता निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्वांचीच तपासणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने केली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शनिवारपासून प्रशिक्षण सुरू होत आहे. त्यानंतर मतदान पथकात सहभागी असलेल्यांनी स्वतःची कोविड चाचणी करून निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व घटकांची तपासणी करण्याची गरज आहे. मतदान प्रक्रियेत उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया वगळता अन्य सेवेसाठी नियुक्ती केली जाते. त्यांचा संपर्क मतदान अधिकाऱ्यांसोबत येतो. जे नागरिक मतदान करणार आहेत. त्यांचासुद्धा प्रत्यक्ष संबंध मतदान पथकासोबत येतो. त्यामुळे या सर्व घटकांची टेस्ट करणेसुद्धा आवश्यक आहे. यापैकी एखादा घटक जरी पॉझिटिव्ह असेल तर संपूर्ण टीमला लागण होण्याचा धोका नाकारता येत नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांच्या नेतृत्वात, जिल्हा सचिव, गणपत विधाते, गंगाधर बोढे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता इटनकर, शालिनी देशपांडे, कार्याध्यक्ष लोमेश येलमुले, कोषाध्यक्ष निखिल तांबोळी, मनोज बेले, सुधाकर कन्नाके, राजू चौधरी, नरेश बोरीकर, अनिल गांगरेड्डीवार यांनी केली आहे.