स्वयंपाक्याकडून विद्यार्थ्यांस मारहाण

By Admin | Updated: September 2, 2015 00:47 IST2015-09-02T00:47:42+5:302015-09-02T00:47:42+5:30

येथून जवळच असलेल्या रानबोथली येथील उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यास आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकीने मारहाण केल्याची..

Cheating students from the kitchen | स्वयंपाक्याकडून विद्यार्थ्यांस मारहाण

स्वयंपाक्याकडून विद्यार्थ्यांस मारहाण

मेंडकी : येथून जवळच असलेल्या रानबोथली येथील उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यास
आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकीने मारहाण केल्याची घटना २८ आॅगस्टला घडली. या स्वयंपाकीवर कारवाई करण्याची मागणी पालकाकडून होत आहे.
सौरभ साईदास बुराडे असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. सौरभ बुराडे हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे २८ आॅगस्टला शाळेत गेला. दुपार पाळीत वर्ग भरत असल्याने सौरभ हा आपल्या मित्रांसोबत शाळेच्या प्रांगणात खेळत असताना, शाळेतील स्वयंपाकीे चांगदेव शेंडे याने तिथे येऊन सौरभला विनाकारक मारहाण करायला सुरूवात केली. या प्रकारामुळे तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आणि सौरभचे मित्र पळून गेले. घडलेले प्रकरण सौरभच्या वडिलांना माहीत होताच ते शाळेत पोहोचले. मुख्याध्यापक भीमराव पाटील यांच्याकडे सदर घडलेल्या घटनेची चौकशी केली असता, मुख्याध्यापकांनी सर्वप्रथम उडवाउडवीचे उत्तरे देऊन शाळेतून हुसकावून लावले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी साईदास बुराडे यांनी मारहाणप्रकरणी मुख्याध्यापक भीमराव पाटील यांच्याकडे अर्ज सादर केला. तरीसुद्धा मुख्याध्यापक पाटील यांनी माहिती देण्यात टाळाटाळ केली.
याप्रकरणी साईदास बुराडे यांनी शिक्षणाधिकारी, संवर्ग विकास अधिकारी ब्रह्मपुरी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे शिक्षण विभाग दखल घेणार काय, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

मुख्याध्यापक व शाळा समिती सभापतीची
चौकशी करण्याची मागणी

शालेय शिक्षण समितीचे सभापती दर्शना खरकाटे यांनीही उडवाउडवीचे उत्तर देऊन साईनाथ बुराडे यांना शाळेतून हाकलून लावले. मारहाण झाल्याने साईदास बुराडे यांचा मुलगा सौरभ हा गेल्या चार-पाच दिवसांपासून शाळेत अनुपस्थित आहे. त्यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान होत असून याला सर्वस्वी मुख्याध्यापक भीमराव पाटील व शालेय शिक्षण समितीच्या सभापती दर्शना खरकाटे हे जबाबदार आहेत. मुख्याध्यापक आणि शालेय शिक्षण सभापती यांची उच्चस्तरीय चौकशी करुन योग्य न्याय द्यावा, अशी मागणी साईदास बुराडे यांनी केली आहे.

Web Title: Cheating students from the kitchen