आनापनाद्वारे होणार विद्यार्थ्यांत परिवर्तन
By Admin | Updated: August 17, 2014 23:04 IST2014-08-17T23:04:24+5:302014-08-17T23:04:24+5:30
विद्यार्थ्यांची एकाग्रता, त्यांचे मन स्थिर राहावे, यातून त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी आता महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये आनापना उपक्रम राबविण्यात येणार आहे.

आनापनाद्वारे होणार विद्यार्थ्यांत परिवर्तन
मनपा शाळेत उपक्रम : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत होणार वाढ
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
विद्यार्थ्यांची एकाग्रता, त्यांचे मन स्थिर राहावे, यातून त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी आता महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये आनापना उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे भविष्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होणार आहे.
महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थीसंख्या घटत आहे. पालकांनीही या शाळांकडे पाठ फिरवली आहे. केवळ गरिबांच्या विद्यार्थ्यांची शाळा अशी ओळख महानगरपालिकांच्या शाळांची झाली आहे. विशेष म्हणजे, या शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मागील वर्षी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार या शाळांतील विद्यार्थ्यांना स्वत:चे नाव, शाळा, वर्ग, शिक्षकांचे नावही लिहिता येत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच शाळांतील विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना पाहिजे तसे यश येताना दिसत नाही. त्यामुळे आता प्रथम विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. आनापनाद्वारे विद्यार्थ्यांचे मन स्थिर करण्यासाठी, त्यांच्यातील चंचलता दूर करून एकाग्रतेसाठी शहरातील सर्व महानगरपालिका शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी दररोज विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्या वेळी दहा मिनिटांपर्यंत श्वसनावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. यामध्ये श्वास घेणे आणि सोडणे याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे मन एकाग्र करण्यासाठी शिक्षक स्वत: विद्यार्थ्यांच्या या क्रियेकडे लक्ष देणार आहे. या क्रियेमुळे चंचलता नाशिही होऊन स्वभावदोषांमध्ये परिवर्तन होते. तसेच विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेमध्येसुद्धा वाढ होणार असून स्वच्छता, निटनेटकेपणाही शिकविण्यात येणार आहे.