चंद्रपूरकरांचा बंद सफल
By Admin | Updated: July 5, 2014 01:17 IST2014-07-05T01:17:01+5:302014-07-05T01:17:01+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पूर्ततेमध्ये मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या चमूने काढलेल्या त्रुट्यावर ...

चंद्रपूरकरांचा बंद सफल
चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पूर्ततेमध्ये मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या चमूने काढलेल्या त्रुट्यावर राज्य सरकारने कसलाही निर्णय न घेतल्याच्या कृतीवर रोष व्यक्त करीत चंद्रपूरकरांनी शुक्रवारी बंद पाळला. या सोबतच, रिलायन्स जीओ इंफोकॉमला शहरात केबल टाकण्यासाठी आणि १०० टॉवरच्या उभारणीसाठी महानगर पालिकेने दिलेल्या परवानगीचा निषेध व्यक्त करीत चंद्रपूरकरांनी या बंदमध्ये सहभाग घेतला. शहरातून निघालेला विशाल मोर्चा, कार रॅली आणि धरण्यांमुळे दिवसभर चंद्रपुरातील वातावरण गरम झाले होते.
काँग्रेस पक्ष, जिल्हा आरोग्य संघर्ष समिती, ज्येष्ठ नागरिक संघ, प्राचार्य फोरम, इंडियन मेडिकल असोसिएशन, चेंबर आॅफ कॉमर्स आदी संघटनासह लहाकनमोठ्या व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी बंदमध्ये सहभाग दर्शविला. सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा बंद होत्या. पेट्रोल पंप, चित्रपट गृहे, उपहारगृहदेखील बंद होती. आवश्यक सेवा वगळता बंद यशस्वी झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्थानिक गांधी चौकात ज्येष्ठ नागरिक संघ, प्रबुद्ध नागरिक संघ आणि शहरातील जनतेने धरणा दिला. यात माजी खासदार नरेश पुगलिया, जिल्हा परिषदेतील विरोधी गटनेते सतीश वारजुकर, मूल पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली पुल्लावार, महापालिकेतील सत्तारुढ काँग्रेसचे गटनेते प्रशांत दानव, नगरसेवक अशोक नागापुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, या धरणास्थळी चेंबर्स आॅफ कॉमर्सचे हर्षवर्धन सिंघवी व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. केवळ शहरातीलच नाही तर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनीही सहभाग घेतला.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास रायपुरे, विजय चंदावार, केशव जेनेकर, गोपाल सातपुते, प्रभाकर गट्टुवार, अशोक संगीडवार, श्रीराम तोडासे, रमेश वेगीनवार, अरुण दंतुलवार, नीलकंठ बलकी, प्रा.माणिक अंधारे, द्रौपदी काटकर, कुमुद राणे यांच्यासह अनेक महिला व पुरुष नागरिक यात सहभागी होते. दुपारी अडीच वाजता ज्येष्ठ नागरिक संघ आणि चंद्रपूर जिल्हा आरोग्य संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.
मनपाने मंजुरी दिलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉमचे टॉवर उभारण्याच्या आणि भूमिगत केबल टाकण्याचा ठराव रद्द करावा आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या मार्गातील त्रृट्या दूर करून याच सत्रात महाविद्यालय सुरू करावे, अशी विनंती या पत्रातून करण्यात आली. काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, एनएसयुआय, महिला काँग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनीही धरण्यात उपस्थित राहून समर्थन दिले.
सकाळी ११ वाजतानंतर न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानातून मोटारसायकल आणि कार रॅली काढण्यात आली. शहरभर ही रॅली घोषणा देत फिरली. (जिल्हा प्रतिनिधी)