लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस (चंद्रपूर) : घुग्घुस परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास वेकोलि वणी क्षेत्रातील निलजई खाणीत मातीचा ढिगारा कोसळला. यात निलजई-उकणी मार्गावर जात असलेली एक कार व एक मोठा हायवा अशी दोन वाहने फसली. या वाहनांतील पाच जण कसेबसे मागच्या दारातून बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. दरम्यान सर्वत्र माती पसरल्याने निलजई-घुग्घुस हा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे.
घुग्घुस वेकोलिअंतर्गत निलजई खाणीतून कोळसा उत्खनन केले जाते. या खाणीतील माती रस्त्याच्या कडेला टाकल्याने परिसरात जणू डोंगराचे स्वरूप आले आहे. सोमवारी (दि. १) परिसरात धुवाधार पाऊस पडला. त्यामुळे परिसर जलमय झाला होता. त्याचवेळी एक स्कॉर्पिओ आणि १८ चाकी ट्रक परिसरातून जात होता. अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने ही दोन्ही वाहने मलब्यात गाडली गेली. स्कॉर्पिओमधून प्रवास करणाऱ्या चार युवक कसेबसे मागचा दरवाजा उघडून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. ट्रकचालकानेही क्षणाचा विलंब न करता उडी टाकून बाहेर पडला. हे युवक यवतमाळ जिल्ह्यातील उकणी येथील रहिवासी असल्याचे समजते. ढिगाऱ्यात अडकलेला ट्रक वंदना ट्रान्सपोर्ट कंपनीचा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कामगारांना दुसऱ्या मार्गाने घरी पाठविले
या अपघातानंतर निलजई-घुग्घुस रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. दुसऱ्या पाळीत खाणीत पोहोचलेल्या वेकोलि कामगारांना वेगळ्या मार्गाने बसद्वारे सुरक्षित घरी पाठवावे लागले. सध्या या मार्गावरून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे.
ढिगारा हटविण्याचे काम सुरू
वेकोलि व्यवस्थापनाने मंगळवारी (दि. २) सकाळपासून ढिगारा हटविण्याचे काम सुरू केले. जेसीबी व अन्य यंत्राद्वारे रस्त्यावरील चिखल व ढिगारा हटविले जात आहे. रस्ता मोकळा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु, पुन्हा पाऊस आल्यास मदतकार्यात अडचण येऊ शकते, अशी माहिती वेकोलि प्रशासनाने दिली.