चंद्रपुरात प्रकल्पग्रस्तांची वीज केंद्राच्या चिमणीवर चढून विरुगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 22:01 IST2020-08-05T22:00:25+5:302020-08-05T22:01:57+5:30
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात बुधवारी सकाळपासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

चंद्रपुरात प्रकल्पग्रस्तांची वीज केंद्राच्या चिमणीवर चढून विरुगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात बुधवारी सकाळपासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. प्रकल्पात जमीन अधिग्रहित होऊनही अजूनपर्यंत नोकरी मिळाली नसल्याने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रासाठी शासनाने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित केल्या होत्या. परंतु अजूनही काही शेतकऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यात आलेले नाही. वारंवार निवेदने देऊनही नोकरी मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले.
बुधवारी सकाळीच हे प्रकल्पग्रस्त महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात जमा झाले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. दरम्यान आंदोलकांपैकी दोन महिला आणि दोन पुरुष प्रकल्पग्रस्त ८ क्रमांकाच्या बॉयलरच्या चिमणीवर चढले. तिथेच त्यांनी ठाण मांडले.
आम्हाला तत्काळ नोकरीत सामावून घेण्यात यावे, अशी त्यांची मागणी असून जर कुणीही आम्हाला खाली उतरविण्यासाठी वर चढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही वरून उडी घेऊन आत्महत्या करू, अशी धमकीच प्रकल्पग्रस्तांनी दिली होती.
प्रकल्पग्रस्त चिमणीवर चढले कसे?
महाऔष्णिक विद्युत केंद्रात चोख सुरक्षा व्यवस्था असल्याचा दावा होत असताना तसेच तिथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचासुद्धा बंदोबस्त असताना हे प्रकल्पग्रस्त बॉयलरच्या चिमणीवर चढलेच कसे, हा मोठा प्रश्न आहे. यावरून केंद्राची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे.