चंद्रपूरचा कचरा डेपो ठरतोयं ‘स्लो पॉयझन’ !
By Admin | Updated: April 19, 2015 01:11 IST2015-04-19T01:11:13+5:302015-04-19T01:11:13+5:30
चंद्रपूर शहरालगत बल्लारपूर मार्गावर तत्कालिन नगर पालिकेने कचरा डेपो उभारला होता.

चंद्रपूरचा कचरा डेपो ठरतोयं ‘स्लो पॉयझन’ !
लोकमत विशेष
चंद्रपूर शहरालगत बल्लारपूर मार्गावर तत्कालिन नगर पालिकेने कचरा डेपो उभारला होता. पुढे महानगर पालिका अस्तित्वात आल्यावर हा डेपो हटला तर नाहीच, उलट कचऱ्याचा थर वाढत गेला. मागील १२ ते १५ वर्षांपासून उभ्या असलेल्या या कचरा डेपोमुळे जैवविविधतेचे आणि मानवी आरोग्याचे काय नुकसान झाले असेल, याचा विचारच कुणी केलेला नाही. विचार झाला असला तरी, या संदर्भात महानगर पालिका आणि पालिकेचे रक्षणकर्ते किती गंभीर आहे, हा तपासण्याचा मुद्दा ठरू शकतो.
अष्टभुजा वॉर्ड हा महानगर पालिकेचाच भाग आहे. या भागात गरीब मजूरवर्ग मोठ्या संख्यने राहतो. अगदी या परिसराला लागूनच हा कचऱ्याचा डेपो आहे. डेपोच्या मागच्या बाजूला वनविभागाचे राखीव जंगल आहे. नियमानुसार कोणत्याही कचरा डेपोभोवती सुरक्षा भिंत हवी. मात्र गेल्या कितीतरी वर्षात ती बांधण्यातच आली नाही. परिणामत: जनावरांचा आणि प्लॅस्टीक, भंगार वेचणाऱ्यांचा येथे मुक्त वावर असतो. शहरभरातून आलेल्या कचऱ्यासोबत प्लास्टिकही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पोहोचते. कॅटरर्स चालकांकडे उरलेले शिळे-उष्टे अन्नही बरेचदा या ठिकाणी आणून टाकले जाते. त्यामुळे जनावरांचा आणि कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. जनावरांच्या पोटात प्लास्टिक गेल्याने जनावरे मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडण्याच्या घटना नव्या नाहीत. या कचरा डेपोवर जनावरे सर्रास प्लॅस्टीक खाताना दिसतात. लागूनच पशुपालकांची वस्ती आहे. त्यांच्या गायी, म्हशी या डेपोवर चरताना दिसतात. दूध हा सकस आहार समजला जात असला तरी, दूध देणारी जनावरे मात्र अशी बेवारस चरत असतील, तर पुढचा विचारच न केलेला बरा.
कचरा डेपोच्या प्रवेशव्दारावर कायमस्वरूपी चौकीदार असायला हवा. मात्र तो येथे कधीच नसतो. परिणात: कुणीही जावे आणि वाटेल ते फेकून यावे, असा प्रकार सुरू आहे. कचरा वाढू नये यासाठी नगर पालिकेचे कर्मचारी या कचरा डेपोवर नेहमी कचरा आणि प्लॅस्टीक जाळताना दिसतात. त्यामुळे येथून धुराचे लोळ नेहमीच दिसतात. आधीच प्रदूषित असलेल्या शहरातील हवेत यातून पुन्हा प्रदुषण पसरते. नियमानुसार प्लॅस्टीक जाळणे गुन्हा असला तरी, मनपाकडूनच तो जाळला जात असल्याने जाब विचारायचा तरी कुणाला, असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला आहे.
या कचरा डेपोला लागूनच नाला आहे. मागील अनेक दिवसांपासून साचलेल्या या कचऱ्यातून झिरपलेले पाणी लगतच्या नाल्याला जावून मिळते. हा नाला पुढे झरपट नदीला मिळतो. कचरा डेपोतून निघणारे दूषित पाणी दुसरीकडे वळविण्यासाठी स्वतंत्र ड्रेनेज तयार करणे अपेक्षित होते. मात्र नद्यांची केवळ चिंता करणाऱ्या महानगर पालिकेला याची गरज न वाटल्याने दुषित पाणी नदीवाटे अनेकांच्या पोटात चालले आहे. याकडे कुणीही गंभीरपणे पाहिलेले नाही.
दररोज जमा होणारा कचराही येथे दुर्लक्षित आहे. हवेसोबत कचऱ्याचे कण उडतात, लगतच्या वस्तीत पोहचतात. अन्नावाटे ते पोटात जावून आरोग्यावर काय परिणाम होत आहे. दररोजचा कचरा उघड्या वातावरणाच्या संपर्कात येणार नाही, यासाठी त्यावर माती टाकून झाकावी, असे नगर विकास मंत्रालयाचे निर्देश आहेत. मात्र त्याचे पालन येथे दिसत नाही. कचऱ्याचे ढिग एकाच ठिकाणी जमणार नाही, यासाठी कचरा डेपोत सर्वत्र रस्ते तयार करण्याचेही निर्देश आहेत. मात्र असे रस्ते येथे नाहीत. कचरा व्यवस्थापनात महानगरपालिका उदासीन असल्याने लगतच्या अष्टभुजा परिसरातील जनतेच्या आणि चंद्रपूरकरांच्याही आरोग्याच्या प्रश्नावर जागे होण्याची गरज आहे.