चंद्रपूर जिल्हा बाजारपेठेत माघारला

By Admin | Updated: October 28, 2015 01:19 IST2015-10-28T01:19:37+5:302015-10-28T01:19:37+5:30

कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पिक असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात.

In the Chandrapur District Market | चंद्रपूर जिल्हा बाजारपेठेत माघारला

चंद्रपूर जिल्हा बाजारपेठेत माघारला

प्रकाश काळे गोवरी
कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पिक असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात. मात्र दरवर्षी कापसाला मिळणारा तोकडा दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे. जिल्हा कापूस उत्पादनात अग्रेसर असतानाही कापसाची मोठी बाजारपेठ चंद्रपूर जिल्ह्यात व्हावी, अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र कापूस उत्पादकांची हाक शासन दरबारी पोहोचली नाही. त्यामुळे कापसाचा जिल्ह्याच बाजारपेठेत माघारला आहे.
कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. कापसाच्या उत्पादनार शेतकऱ्यांचा वर्षभराचा वार्षिक बजेट अवलंबून असतो. विदर्भाच्या सुपिक मातीत कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा, भद्रावती हे तालुके कापसासाठी अग्रेसर मानले जातात. शेतकऱ्यांची भिस्तच कापसावर असल्यने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कापूस पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. कापसाचा उत्पादन खर्च बघता, त्या तुलनेत मिळणारा कापसाचा दर तोकडा आहे. उत्पादनावर केलेला खर्च भरुन निघणार नाही, एवढी बिकट अवस्था पिकांची झाली आहे. दिवसरात्रं काबाडकष्ट करुन हाडाची काडं करणारा शेतकरी कापसाच्या रुपात पांढरे सोने पिकवितो. सोन्यासारखाच कापसाला भाव मिळणे अपेक्षित आहे. मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. तीन- चार दशकापासून शेतकरी कापूस पिकवत आहे. परंतु शेतकऱ्यांची होत असलेली परवड अजुनही थांबलेली नाही.
कापूस उत्पादकांच्या चंद्रपूर जिल्ह्यात कापसाची सर्वांत मोठी बाजारपेठ व्हावी, ही शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांची आर्त हाक शासन दरबारी पोहोचलीच नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकवूनही शेतकऱ्यांना तो नाईलाजाने परप्रांतात विकावा लागत आहे. तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे तर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या तुलनेत कापसाच्या बाजारपेठच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा पोरका झाला आहे. जिल्ह्यात कापसाचे मोठे उत्पादन घेऊनही कापसाला मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना कापूस बाहेरील राज्यात विकावा लागत आहे. त्यासाठी लागणारा प्रवास खर्च शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे.
यावर्षी कापूस पिकाला योग्य दर मिळेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु मायबाप सरकारने चार हजार १०० रुपये हमीभाव कापसाला जाहीर केला. कापसाला दिला गेलेला तोकडा दर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखा आहे. यावर्षी अपुऱ्या पडलेल्या पावसाने उत्पादनात मोठी घट झाली आहे.
कापूस वेचणीचे दर सहा ते सात रुपये झाल्याने व मजुर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव काकुळतीला आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात कापूस फुटून आहे. मात्र कापूस वेचणीला मजुर मिळविण्यासाठी शेतकरी मजुरांच्या शोधात गावोगाव फिरत आहेत. त्यांना प्रवासाचा वेगळा खर्च देऊनही मजुरांची वाणवा आहे. कापूस झाडावर लोंबकळत असल्याने तो कोणत्याही क्षणी भूईसपाट होण्याच्या धोका निर्माण झाला आहे. सारी यंत्रणाच शेतकऱ्यांच्या विरुद्ध उभी ठाकल्याने दिवसेंदिवस शेती परवडेनाशी झाली आहे. शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना छळत आहे.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या शासकीय कापूस संकलन केंद्रावर कापूस खरेदीचा श्रीगणेशाच झाला नाही. त्यामुळे खासगी व्यापारी याचा पूरेपूर फायदा घेऊन कवडीमोल गावात कापसाची खरेदी करीत आहे.

Web Title: In the Chandrapur District Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.