लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कंबरेच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या रुग्णाच्या पत्नीने रुग्णालयातीलच एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी तुकूम येथील एका खासगी रुग्णालयात सोमवारी पहाटे ६ वाजता उघडकीस आली.
मयुरी विकास पंधरे (२८, रा. वणी, ता. यवतमाळ), असे आत्महत्या करणाऱ्या रुग्णाच्या पत्नीचे नाव आहे. पतीचे सततचे कमरेचे दुखणे, रुग्णालयाचा वाढत्या खर्चाने निर्माण झालेला आर्थिक ताण आदी कारणाने तिने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील विकास पंधरे यांना अनेक दिवसांपासून कंबरदुखीचा पत्नी त्रास आहे. ते येथील तुकूम परिसरातील कुलकर्णी यांच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
औषधोपचाराने काही दिवस आराम मिळत होता; मात्र दुखणे पुन्हा डोके वर काढत होते. सततचे उपचार, रुग्णालयाच्या चकरा व वाढत्या खर्चामुळे पंधरे कुटुंबीयांना आर्थिक समस्यांनी ग्रासले होते. दोन दिवसांपूर्वी दुखणे वाढल्याने विकास पंधरे मयुरीसमवेत चंद्रपूरच्या रुग्णालयात आले. डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी भरती केले. रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर बिलाच्या रकमेची जुळवाजुळव कशी करायची, हा विचार मयुरीच्या डोक्यात सुरू होता. अशात मयुरीने मदतीसाठी आपल्या आईला रुग्णालयात बोलावून घेतले. मात्र, ती पैशाच्या जुळवाजुळवीच्या प्रश्नावर उत्तर शोधू शकली नाही. यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. नवऱ्याच्या आजारावर उपचारासाठी पैसे नसल्याने पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बाहेर पडली ती परत आलीच नाही...
पती व आईला लघुशंकेला जाते, सांगून मयुरी खोलीतून बाहेर पडली. मात्र, पुन्हा ती परतलीच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता, रुग्णालयातीलच एका खोलीत ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. रुग्णालय व्यवस्थापनाने घटनेची माहिती रामनगर पोलिसांना दिली. जमनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या चमूने घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.