केवळ एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पूर्ण दवाखान्याचा प्रभार आल्याने एक डॉक्टर कुठे पाहणार, हा चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसत आहे. परिणामी आर्थिक भुर्दंड सहन करीत खासगी दवाखान्याचा आश्रय घ्यावा लागत आहे. शासनाने अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सोयी-सुविधा मुबलक देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली. परंतु कधीकाळी डाॅक्टराचा अभाव राहत असल्याने व येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक होत नसल्याने दवाखान्याचा कामकाज रामभरोसे असल्याचे निदर्शनास येत आहे. आजतागयत रुजू झालेले डॉक्टरसुद्धा रजेवर गेल्याचे समजते. त्यामुळे रुग्णांना औषध उपचार कोण करणार, हा प्रश्न ऐरणीवर येऊन ठेपला गेला आहे. तेव्हा जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
नवेगाव मोरे येथे डॉकटराअभावी रुग्णांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST