बाहेर गेलेल्या मतदारांवर उमेदवारांचे ""मंथन""
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:29 IST2021-01-03T04:29:03+5:302021-01-03T04:29:03+5:30
घनश्याम नवघडे नागभीड : नागभीड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर चढत आहे. यासोबतच उमेदवारांना विविध बाबींवर लक्षही द्यावे लागत आहे. ...

बाहेर गेलेल्या मतदारांवर उमेदवारांचे ""मंथन""
घनश्याम नवघडे
नागभीड : नागभीड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर चढत आहे. यासोबतच उमेदवारांना विविध बाबींवर लक्षही द्यावे लागत आहे. यापैकी प्रमुख बाब म्हणजे कामासाठी बाहेर गेलेले मजूरही आहे. निवडणुकीच्या तारखेपर्यंत गावात येतील का ? आणि नाहीच आले तर त्यांना कसे आणता येईल, यावर उमेदवारांचे मंथन सुरू आहे.
नागभीड तालुका उद्योगविरहित आहे. म्हणूनच शेतीची कामे आटोपली की या तालुक्यातील मजूर रोजगारासाठी दरवर्षी नागपूर, वर्धा या जिल्ह्यात आणि आंध्र, तेलंगणाच्या सीमावर्ती भागात स्थलांतर करीत असतात. आतापर्यंत तालुक्यातील काही गावांतील मजुरांनी कामासाठी स्थलांतर केले असून अनेक गावांत स्थलांतराची ही प्रक्रिया सुरू झाली असल्याचे बोलले जात आहे.
नागभीड तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक आहे. मात्र, यातील दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे. विश्वसनीय माहितीनुसार, प्रत्येक गावातील २५ ते ५० मजुरांनी कामाच्या शोधात आतापर्यंत गावातून स्थलांतर केले आहे. मतदानाच्या तारखेपर्यंत ते परत येण्याची शक्यता नाही आणि मतदानासाठी गावी परत येऊन परत कामावर जाणे हे या मजुरांना आर्थिकदृष्ट्या परवडणारेही नाही. म्हणूनच अशा मतदारांसाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, याची विवंचना उमेदवारांना लागून आहे.
गावातील ग्रामपंचायतींचे प्रभाग अतिशय लहान असतात. ३०० ते ४०० मतदार एका प्रभागात असतात. त्यातच एका प्रभागातून चार ते पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहत असल्याने मतांची विभागणी मोठ्या प्रमाणावर होत असते. म्हणूनच बाहेर गेलेले मजूर मतदार निकालावर निश्चितच प्रभाव टाकू शकतात, याची जाणीव उमेदवारांना आहे. म्हणूनच मतदानाच्या दिवशीपर्यंत गावी कसे आणता येतील, याचे आराखडे उमेदवार करीत आहेत.
बॉक्स
खर्चाची चाचपणी
मजूर मतदार कोणत्या जिल्ह्यात आहेत, त्यातही कोणत्या तहसीलमध्ये आहेत, त्यांना गावात आणण्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, गावात आल्यानंतर ते आपल्याला खरोखरच मतदान करतील का, याचा अभ्यास उमेदवार करीत असल्याची माहिती आहे.
कोट
गावात कोणतेच काम नसल्यामुळे आपले उदरनिर्वाह करण्यासाठी मोहाळी ग्रामपंचायतमधील ५० ते ६० मजूर कामाच्या शोधात दुसऱ्या जिल्ह्यात गेले आहेत. आणखी काही मजूर जाण्याच्या तयारीत आहेत.
- गोपाळ दडमल, जि. प. सदस्य मोहाळी चक.