वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी मोहीम
By Admin | Updated: July 10, 2014 23:30 IST2014-07-10T23:30:02+5:302014-07-10T23:30:02+5:30
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियमाअंतर्गत वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी आता खुद् जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनीच कंबर कसली आहे. यासाठी एक वेळापत्रक

वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी मोहीम
मोहिमेचा प्रारंभ : जिल्हाधिकाऱ्यांनी कसली कंबर
चंद्रपूर : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियमाअंतर्गत वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी आता खुद् जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनीच कंबर कसली आहे. यासाठी एक वेळापत्रक निश्चित केले असून ही मोहिम सुवर्ण जयंती राजस्व अभियानाचा भाग म्हणून जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा आज १० जुलैपासून शुभारंभही करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अनेक गावातील वनहक्क दावे प्रलंबित आहेत. यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आले आहे. आतापर्यंत याबाबतची कार्यवाही मंद गतीने सुरू होती. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी ही कामे जलदगतीने निकाली काढण्यासाठी एक कार्यक्रमच जाहीर केला आहे. त्यानुसार ग्राम पातळीवर प्राप्त झालेल्या दाव्यांची छाननी करून ग्राम वनहक्क समिती पात्र दावे २५ जुलै २०१४ पर्यंत संबंधित ग्रामसभेकडे सादर करणार आहेत. नामंजूर केलेल्या दावेदारांना ग्राम वनहक्क समिती लेखी स्वरुपात कळवतील. गावात एकही दावा शिल्लक राहणार नाही, याची संबधित ग्राम वनहक्क समितीने दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे. गावात एकही दावा सादर करावयाचा शिल्लक नसल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित वनहक्क समितीला तहसीलदार यांच्याकडे सादर करावे लागणार आहे.
तहसील कार्यालयातून प्राप्त दाव्यांना सोबत दिलेला नमुना अ लावण्याची कार्यवाही संबंधित वनविभाग ८ आॅगस्ट २०१४ पूर्वी पूर्ण करून त्याच दिवशी दावे संबंधित तहसील कार्यालयात सादर करतील. या आधी संबंधित तहसील कार्यालयाने पाठविलेले दावे प्रलंबित असेल तर सदर दावेसुद्धा या तारखेपर्यंत निकाली काढावयाचे आहे, असे वनविभागाला सांगण्यात आले आहे. वनविभागाकडून प्राप्त झालेले दावे संबंधित तहसीलदार १० आॅगस्ट २०१४ रोजी उपविभागीय समितीकडे मंजुरीकरिता दाखल करतील.
तहसीलदारामार्फत प्राप्त झालेल्या दाव्यांची छाननी करून सदर दाव्यावर निर्णय घेण्याकरिता १२ आॅगस्ट २०१४ रोजी उपविभागीय स्तरीय समितीची बैठक घेतील व मंजूर झालेले दावे जिल्हास्तरीय समितीकडे त्याच दिवशी दाखल करतील. उपविभागीयस्तरीय समितीकडून मंजूर झालेल्या दाव्यांची छाननी करून सदर दाव्यावर निर्णय घेण्याकरिता १४ आॅगस्ट २०१४ रोजी जिल्हा स्तरीय समितीची बैठक आयोजित करून सदर दावे निकाली काढले जाणार आहेत. (शहर प्रतिनिधी)ृ