परवाना नसतानाही सोयाबीन खरेदी
By Admin | Updated: November 4, 2014 22:36 IST2014-11-04T22:36:42+5:302014-11-04T22:36:42+5:30
परिसरातील काही व्यापारी शेतकऱ्यांचे सोयाबीन विना परवाना खरेदी करीत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा फटका बसत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष अन्

परवाना नसतानाही सोयाबीन खरेदी
प्रशासनाचे दुर्लक्ष : बाजार समितीला फटका
कोरपना : परिसरातील काही व्यापारी शेतकऱ्यांचे सोयाबीन विना परवाना खरेदी करीत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा फटका बसत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष अन् कर्मचाऱ्यांच्या देवघेवी वृत्तीमुळे या प्रकारात कमालीची वाढ झाली आहे.
शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना व्यापाऱ्यांजवळ असणे गरजेचे आहे. अशा परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बाजार समितीच्या परिसरातून (वॉर्डातून) शेतमालाची खरेदी करता येते. समितीच्या वॉर्डात खरेदी केलेला शेतमाल बाहेर नेतांना व्यापाऱ्यानी एकूण शेतमालाच्या खरेदी राशीवर प्रती शेकडा १ रुपया ०५ पैसे सेस बाजार समितीला देणे बंधणकारक आहे. असे असताना येथील काही व्यापारी सेस राशी तसेच चार टक्के विक्रीकर वाचविण्याकरिता मंडीत अथवा बाजारात, वॉर्डात खरेदी न करता मोठ्या प्रमाणावर खाजगीत खरेदी करीत आहेत. ही बाब येथील प्रशासक व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना माहित असूनसुद्धा त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. संगनमताने हा गौरप्रकार गेल्या काही दिवसांपासून बिनबोभाटपणे सुरु आहे.
येथील बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुदत संपल्याने शासनाने येथे प्रशासक नियुक्त केला आहे. या प्रशासकाकडे कोरपना, राजुरा व गोंडपिपरी या तीन बाजार समित्यांचा प्रभार आहे. नेमकी ही बाब हेरुन गैरप्रकारास सुरुवात झाली आहे. यंदा दिवाळीपूर्वीच काही शेतकऱ्यांचे सोयाबीन हाती आले. मात्र व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा या हेतुने कोरपना येथे ३१ आॅक्टोबरला तर गडचांदूरात ३ नोव्हेंबरला समितीने खरेदी सुरु केल्याचा आरोप आहे. कोरपना येथे पाच दिवसात ३०० पोते तर गडचांदुरात दोन दिवसात अवघे १८७ पोते सोयाबीनची खरेदी झाली. तर दुसरीकडे खासगी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात किमान १० हजार क्विंटलची खरेदी केल्याची माहिती आहे.
गोदाम तपासणी केल्यास त्याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या व्यवहारात बाजार समितीचा संबंध येत नसल्याने कोट्यवधीच्या या व्यवहारात समितीला कुठलेही उत्पन्न मिळत नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. (तालुका प्रतिनिधी)