व्यापारी युवकास पोलिसांकडून बेदम मारहाण

By Admin | Updated: September 2, 2015 00:43 IST2015-09-02T00:43:36+5:302015-09-02T00:43:36+5:30

जिल्ह्यातील दारू तस्करीवर आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चंद्रपूर पोलिसांच्या पथकाने निरपराध व्यापारी युवकास सोमवारच्या रात्री अमानुष मारहाण केली.1

Businessman beaten by businessman Yuvakas | व्यापारी युवकास पोलिसांकडून बेदम मारहाण

व्यापारी युवकास पोलिसांकडून बेदम मारहाण

चंद्रपूर : जिल्ह्यातील दारू तस्करीवर आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चंद्रपूर पोलिसांच्या पथकाने निरपराध व्यापारी युवकास सोमवारच्या रात्री अमानुष मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर चेंबर्स आॅफ कॉमर्स आणि विविध संघटनांनी पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी निषेध रॅली काढण्याची घोषणा केली आहे.
निरपराध व्यापारी युवकाला पोलिसांनी नाहक मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना पोलीस खात्याच्या अंगावर शेकण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ व्यापारी संघटनांनी बुधवारी चंद्रपूर बंदचे आयोजन केले होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्तीनंतर बंद रद्द करून निषेध रॅली काढण्याचे ठरले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी स्थानिक जैन भवनात व्यापारी संघटना आणि चेंबर आॅफ कॉमर्सची बैठक झाली. यात चंद्रपूर मनपाच्या स्थायी समितीचे माजी सभापती रामू तिवारी, सदानंद खत्री, दामोदर मंत्री, रामकिशोर सारडा, रमेश बोथरा, विनोद बजाज उपस्थित होते. या सभेमध्ये संघटनांच्या विविध प्रतिनिधींनी पोलिसांच्या या भूमिकेचा जोरदार निषेध केला. रोहीत बोथरा हा युवक व्यापारी असल्याचे आणि निर्दोष असल्याचे माहीत झाल्यावरही पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. हा युवक आपल्या व्यापारासंदर्भातील वसुलीची रक्कम घेवून चारचाकी वाहनाने भद्रावती मार्गे चंद्रपूरकडे रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान परत येत होता. मार्गात भद्रावतीजवळील घोडपेठ या गावापासून रोहितच्या वाहनाचा पाठलाग एका चारचाकी वाहनाने सुरू झाला. विशेष म्हणजे या युवकाचा पाठलाग करणाऱ्या वाहनाला नंबर प्लेटच नव्हती. सायरन अथवा पोलीस विभागाचे कुठलेही चिन्ह लावलेले नव्हते. त्यामुळे आपल्यावर कुणीतरी पाळत ठेवून पाठलाग करीत असावे, असे वाटल्याने रोहीतने आपले वाहन न थांबविता प्रवास सुरूच ठेवला. चंद्रपुरात पोहचल्यावर वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ वाहतूक पोलीस दिसल्याने त्याला धीर आला. त्यामुळे त्याने आपले वाहन थांबविले. मात्र तेवढ्यात पाठलाग करीत असलेल्या वाहनही तिथे पोहचले. त्यातून काही व्यक्ती वेगाने खाली उतरले आणि काही कळायच्या आतच रोहीतला वाहनाबाहेर खेचून मारहाण करायला सुरूवात केली. एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नाही, तर त्यांनी त्याला वाहतूक विभागाच्या कार्यालयात खेचत नेवून सुमारे दीड तास मारहाण केली. आपण व्यापारी असून कसल्याही गुन्ह्याशी आपला संबंध नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते, असा घटनाक्रम या सभेत सांगण्यात आला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना रामकिशोर सारडा म्हणाले, व्यापारी नेहमी कायद्याचा सन्मान करतात. मात्र रोहीत बोथरा यांच्यावर झालेला अन्याय सहन न करण्यापलिकडचा आहे. चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी यांनीही या घटनेचा निषेध केला. संचालन मुन्ना भंडारी, यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)

आज निषेध रॅली
या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी २ सप्टेंबरला चंद्रपुरातून निषेध रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला जैन भवन येथून दुपारी ३ वाजता प्रारंभ होणार असून शहरातील प्रमुख मार्गाने रॅली फिरून जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयावर जाईल. तिथे व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून निवेदन दिले जाईल. या रॅलीमध्ये व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची विनंती चेंबर आॅफ कॉमर्स आणि व्यापारी मंडळांनी केली आहे.

Web Title: Businessman beaten by businessman Yuvakas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.