आठ ट्रॅक्टर तणस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:27+5:302021-03-31T04:28:27+5:30
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुका मुख्यालयापासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या मुरपार गावालगत मोकळ्या जागेत ठेवलेल्या तणसाच्या ढिगाऱ्यांना आग लागल्याने जवळपास ...

आठ ट्रॅक्टर तणस जळून खाक
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुका मुख्यालयापासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या मुरपार गावालगत मोकळ्या जागेत ठेवलेल्या तणसाच्या ढिगाऱ्यांना आग लागल्याने जवळपास आठ ट्रॅक्टर तणस जळून खाक झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली.
मुरपार हे गाव जंगलव्याप्त भागात आहे. या गावालगत असलेल्या मोकळ्या जागेत गुलाब कुक्से व सूर्यभान देशमुख यांचे तणसाचे ढीग ठेवले होते. अचानक आग लागल्याने तणसाचे ढीग जळून खाक झाले. घटनेची माहिती नागरिकांनी जि.प. सदस्य डाॅ. राजेश कांबळे यांना दिली. त्यांनी लगेच सदर माहिती पोलिसांना कळविली. घटनेची माहिती मिळताच मेंडकी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार प्रकाश कावळे, खुशाल उराडे, पवन डाखरे, चंदू कांबळी हे घटनास्थळी दाखल झाले. ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत पोलीसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्याने ते शक्य झाले नाही. त्यानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.