२४ हजार लोकसंख्येचा भार एकाच डॉक्टरवर
By Admin | Updated: May 25, 2017 00:29 IST2017-05-25T00:29:30+5:302017-05-25T00:29:30+5:30
सावली तालुक्यातील अंतरगाव प्राथिमक आरोग्य केंद्रात सहा उपकेंद्र येतात.

२४ हजार लोकसंख्येचा भार एकाच डॉक्टरवर
अंतरगाव आरोग्य केंद्रातील प्रकार : वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवरा : सावली तालुक्यातील अंतरगाव प्राथिमक आरोग्य केंद्रात सहा उपकेंद्र येतात. मात्र या उपकेंद्रात एकच डॉक्टर असल्याने सुमारे २४ हजार ३६५ लोकांचे आरोग्य त्या एका डॉक्टरच्या हातात असल्याने चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या आरोग्य केंद्रात एक एमबीबीएस दर्जाचा वैद्यकीय अधिकारी अपेक्षीत आहे. मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी भोयर प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेल्याने त्यांच्या जागी वैद्यकीय अधिकाऱ्याचा पदभार विहीरगावच्या उपकेंद्रातील बीएएमएस डॉक्टरांकडे देण्यात आला. तेव्हापासून ३० एप्रिल २०१७ पर्यंत एक उपकेंद्र व पीएचसी आणि शासकीय आरोग्य उपकेंद्राची जबाबदारी एकाच डॉक्टरावर होती. त्यासोबत एक निवासी वैद्यकीय अधिकारी अपेक्षित होता. मात्र ३० एप्रिलला प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवारत असलेले डॉ. उरकुडे यांची सेवानिवृत्ती झाली. तेव्हापासून वैद्यकीय अधिकाऱ्याविनाच हे केंद्र सुरू आहे. शासनाचे या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. परिणामी या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. या ठिकाणी असलेली रुग्णवाहिका अनेक महिण्यांपासून बिघडलेली आहे. सहा उपकेंद्रातून प्रसृतीकरिता किंवा आजारी रुग्णांना हलविण्यासाठी एकही रुग्णवाहिका नाही. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकत नाही. परिणामी रुग्णांचे आरोग्य धोक्यात आहे.
तसेच कडक उन्ह तापत असूनसुद्धा आरोग्य केंद्रातील एकही कुलर सुरू नाही. त्यामुळे रुग्णांना तसेच ग्रामीण भाग असल्याने वेळी अवेळी विद्युत सेवा खंडीत होत असते. मात्र येथील इन्वर्टर अनेक महिन्यांपासून बंद आहे. सदर आरोग्य केंद्र हे मागील १० ते ११ वर्षापासून २४ बाय ७ (आयपीएचएस)अंतर्गत सेवा देणारे केंद्र म्हणून विविध स्तरावरुन निधी पुरविला जातो. परंतु २४ बाय ७ अशी आरोग्य सेवा या परिसरातील रुग्णांना कधीही मिळाली नसल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना खासगी रुग्णालयाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे अधिक पैसे खर्च होत आहेत.
विहिरगाव येथे एक उपकेंद्र आहे. तिथे बऱ्याच वर्षापासून एक परिचर रुग्णांवर उपचार करीत होता. येथील डॉक्टरांकडे पीएचसीचा वैद्यकीय अधिकाऱ्याचा पदभार होता. मात्र ते आता सेवानिवृत्त झाले.व परिचर सेवा बढतीने स्थानांतरण झाले. त्यामुळे हे उपकेंद्र केवळ एका आरोग्य सेवीकेवर अवलंबून आहे. एक आरोग्य सेवक सोबतीला घेवून हे उपकेंद्र चालविण्याची नामूष्की आरोग्य विभागावर आली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून शासनाने या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे, पायाभूत सुविधांची पूर्तता करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.