पूजेसाठी आर्जव करून बोलवावे लागले बैल
By Admin | Updated: September 14, 2015 00:47 IST2015-09-14T00:47:24+5:302015-09-14T00:47:24+5:30
इतर क्षेत्रासोबतच शेतीमध्येही यांत्रिकीकरणाचा प्रवेश झाल्याने साहजिकच बैलांची संख्या कमी झाली आहे.

पूजेसाठी आर्जव करून बोलवावे लागले बैल
यांत्रिकीकरणाचा परिणाम : बैलांची संख्या झाली कमी
नागभीड : इतर क्षेत्रासोबतच शेतीमध्येही यांत्रिकीकरणाचा प्रवेश झाल्याने साहजिकच बैलांची संख्या कमी झाली आहे. याचा परिणाम यावर्षी गावखेड्यातील पोळ्यात जाणवला. नागभीडमध्ये तर अनेक कुटुंबांना बैलाच्या पुजेसाठी तासन्तास प्रतिक्षा करावी लागली. तर अनेकांवर बैलधारकांना आर्जव करून घरी बोलावून पूजा करावी लागली.
शनिवारी सर्वत्र पोळा सण साजरा झाला. तसा तो नागभीड मध्येही साजरा करण्यात आला. एकेकाळी नागभीडच्या पोळ्याची पंचक्रोशीत ख्याती होती. संबंध बाजार चौक पोळ्याच्या दिवशी बैलांनी फुलून असायचा. प्रत्येक शेतकरी आपआपल्या कुवतीप्रमाणे बैल सजवून पोळ्यात आणायचा आणि सजवलेले हे बैल बाजार चौकाची वेगळीच शोभा वाढवायचे. बैलांच्या गळ्यातील घुंगर तसेच घोल्लरांच्या आवाजाने तर या शोभेला वेगळीच लय यायची.
संध्याकाळच्या वेळेस पोळा फुटल्यानंतर आवाजाच्या या लयीला आणखीच गती यायची. अगदी झुंजु भुंजु होईपर्यंत शेतकरी आपले बैल घरोघरी न्यायचे आणि यथा सामग्र प्रत्येक घरी या बैलांची पुजा व्हायची. एकेका घरी दहा ते बारा जोड्या या हमखास यायच्याच आणि प्रत्येक जोडीची पूजासुद्धा तेवढ्याच उत्साहाने व्हायची.
पण आता काळ बदलला आणि या काळाबरोबरोबर काळाच्या व्याख्या सुद्धा बदलल्या. शेतीमध्ये यांत्रिकीरणाचा प्रवेश झाला. जी शेती केवळ बैलांच्या भरवशावर केली जायची त्या शेतीत आता विविध प्रकारची यंत्रे दिसू लागली. परिणामी शेतीतून बैल हद्दपार होऊ लागले. याशिवाय पडीत जमिनी, कुरणे आणि वनकायद्यामुळे चऱ्हाटीची जागा कमी झाल्याने गोधन पाळण्यावरही अनेक मर्यादा आल्या आणि यातून बैलांची निर्मिती थांबली.
या सर्वांचा परिणाम आता पोळ्यावर दिसू लागला आहे. आणि म्हणूनच मोठ्या शहर व महानगराचे लोन आता नागभीडसारख्या गावातही पोहोचले. त्याचाच परिणाम म्हणून बैलांच्या पूजेसाठी लोकांना एकतर प्रतिक्षा करावी लागली किंवा बैलधारकांना आर्जव करून घरी बोलावून बैलांची पूजा करावी लागली. (तालुका प्रतिनिधी)