दोन दिवस बंद राहिली बीएसएनएलची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:02 IST2019-02-27T23:01:49+5:302019-02-27T23:02:05+5:30
मागील दोन दिवस भारत संचार निगमची सेवा पूर्णपणे बंद आहे. सोमवारच्या रात्री १० वाजेपासून बंद झालेली ही सेवा बुधवारी ३ वाजता सुरू झाली. परिणामी नागरिक त्रस्त झाले. निगमने आपली सेवा त्वरित सुधारावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

दोन दिवस बंद राहिली बीएसएनएलची सेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : मागील दोन दिवस भारत संचार निगमची सेवा पूर्णपणे बंद आहे. सोमवारच्या रात्री १० वाजेपासून बंद झालेली ही सेवा बुधवारी ३ वाजता सुरू झाली. परिणामी नागरिक त्रस्त झाले. निगमने आपली सेवा त्वरित सुधारावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
नागभीड येथे इतर मोबाईल कंपण्यांचे नेटवर्क मोठ्या प्रमाणावर विस्तारले असले तरी बीएसएनएलचेही ग्राहक मोठया प्रमाणावर आहे.हे ग्राहक पूर्णपणे बीएसएनएलवर अवलंबून असले तरी बीएसएनएलच्या टुकार सेवेने चांगलेच त्रासून गेले आहेत.
गेली दोन दिवस या सेवेने तर चांगलाच कहर केला. इंटरनेट आणि भ्रमनध्वनी या दोन्ही सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या. बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराची कल्पना नसलेले अनेक मोबाईलधारक आपलाच मोबाईल खराब झाला असेल, अशी समजूत करून वारंवार मोबाईलमधील सीमकार्ड काढून ते स्वच्छ करून परत मोबाईलमध्ये टाकत होते. काही ग्राहक मोबाईल बंद करून परत सुरू करीत राहिले. ही स्थिती पाहून बीएसएनएल ग्राहकांना सेवा देत आहे की ग्राहकांच्या डोक्याला ताप हेच समजेनासे झाले होते. गेल्या काही वर्षात ग्राहकांना अशीच सेवा मिळत गेल्याने अनेक बीएसएनएलच्या ग्राहकांनी आपला सीमकार्ड दुसऱ्या कंपनीत परावर्तीत केली व करीत आहेत.
आज अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच इंटरनेट आणि भ्रमनध्वनी या सेवा लोकांची आवश्यक गरज बनली आहे. बीएसएनएलने आपल्या सेवेत सुधारणा करावी, अशी ग्राहकाची मागणी आहे. दरम्यान यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता या सेवेत मोठा बिघाड निर्माण झाल्याने जिल्ह्यातील चार तालुक्यात ही सेवा खंडित झाल्याचे सांगण्यात आले.