चिमुरातील ‘भाऊ’ करतो बहिणींना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:40+5:30

चिमूरपासून पाच किलोमीटर अंतरावर जंगलाशेजारी २० बाय ५० च्या एका टिनाच्या शेडमध्ये या ‘भाऊ’चा (बीएचएयू) प्रपंच मागील आठ महिन्यांपासून सुरू आहे. या भाऊने आजपर्यंत ८० बहिणींना आत्मनिर्भर केले असून आजघडीला नऊ बहिणी त्या भावाच्या आश्रयाला आहेत.

The 'brothers' in Chimur make their sisters financially self-sufficient | चिमुरातील ‘भाऊ’ करतो बहिणींना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर

चिमुरातील ‘भाऊ’ करतो बहिणींना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर

ठळक मुद्दे८० बहिणींना लाभ । बांबू हॅन्डीक्राफ्ट आर्ट युनिट

राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : भाऊ आणि बहिणीचे नाते अतूट आहे आणि भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी, सुख-दु:खात, तिला स्वयंपूर्ण करण्यासाठी सदा तत्पर असतो.असा हा भाऊ म्हणजे पारिवारिक रक्ताच्या नात्यातला. मात्र चिमूर नगर परिषद हद्दीतील हा भाऊ म्हणजे बांबू हॅन्डीक्राफ्ट युनिट आहे. आपल्या बहिणीला स्वत:च्या पायावर उभे करून स्वयंपूर्ण बनवून आत्मनिर्भर करण्याचे कार्य मागील काही महिन्यांपासून या युनिटद्वारे सुरू आहे.
चिमूरपासून पाच किलोमीटर अंतरावर जंगलाशेजारी २० बाय ५० च्या एका टिनाच्या शेडमध्ये या ‘भाऊ’चा (बीएचएयू) प्रपंच मागील आठ महिन्यांपासून सुरू आहे. या भाऊने आजपर्यंत ८० बहिणींना आत्मनिर्भर केले असून आजघडीला नऊ बहिणी त्या भावाच्या आश्रयाला आहेत.
वन विभागाच्या वतीने व चिचपल्ली येथील बीआरटीसी केंद्रांंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमा अंतर्गत बांबू हॅन्डीक्राफ्ट आर्ट युनिट भाऊ या युनिटमध्ये बांबूपासून अनेक हस्तकला शिल्प मोनाटो, डायरी कव्हर, मोबाईल स्टॅन्ड, की होल्डर, फोटो फ्रेम, ट्रे, सोफा, बेड आदी वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
चिमूर परिसरातील या युनिटने तालुक्यातील ८० बहिणींना बांबूपासून अनेक वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले तर आजघडीला हे युनिट पाच महिलांना डायरी कव्हर, मोबाईल स्टॅन्ड बनविण्याचे प्रशिक्षण देत आहे. यामधून सात बहिणी प्रशिक्षित झाल्या असून त्या विविध प्रकारच्या वस्तू बनवून रोज दोनसे ते तीनशे रुपये उत्पन्न मिळवित आहेत. यातून या महिला आर्थिकदृष्टया आत्मनिर्भर झाल्या आहेत. त्यामुळे वन विभागाचा हा भाऊ तालुक्यातील बहिणींसाठी आधारवड बनला आहे. परिसरातील नव्हे तर जिल्ह्यातील महिलांनी या केंद्राचा लाभ घ्यावा.

चिमूर येथील बांबू हॅन्डीक्राफ्ट आर्ट युनिटमध्ये आजपर्यत ८० महिलांना प्रशिक्षित करण्यात आले आहेत. त्यापैकी काही महिला दिवसाला दोनसे ते तीनशे रुपये रोज मिळवत आहेत. त्यामुळे त्या आत्मनिर्भर झाल्या आहेत.
- रोशन जुमडे, प्रशिक्षक
बांबू हॅन्डीक्राफ्ट आर्ट युनिट, चिमूर

Web Title: The 'brothers' in Chimur make their sisters financially self-sufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :artकला