भारनियमनाचा रबीलाही बसणार फटका
By Admin | Updated: October 30, 2015 01:15 IST2015-10-30T01:15:24+5:302015-10-30T01:15:24+5:30
निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप पिकाची नासधुस झाली. बळीराजाचे आर्थिक नुकसान झाले.

भारनियमनाचा रबीलाही बसणार फटका
कधी सुधारणार परिस्थिती : पेरणीला होतोयं उशीर
माजरी : निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप पिकाची नासधुस झाली. बळीराजाचे आर्थिक नुकसान झाले. अवकाळी पाऊस, सुसाट वादळ- वारा आणि काही भागात सुका दुष्काळ आदी संकटामुळे खरीप पिकाच्या उत्पादनात घट आली. या संकटातून शेतकरी दादा कसाबसा सावरला. तोच आता रब्बी पिकांवरही विजेच्या भारनियमनाचे संकट ओढवले असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
रोजच विद्युत भारनियमनाच्या नावावर सिंगल फेस विद्युत पुरवठा होतो आणि त्याचा वेळही ठराविक नाही. अचानक विद्युत पुरवठ्यात कमी-जास्त दाब होत असल्याने शेतकऱ्यांच्या कृषीपंपात बिघाड होत आहे. काही शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या मोटारी जळल्यात. यामुळे पाणी असून शेतात ओलीत करु शकत नाही आणि रबी पिकांच्या पेरणीला विलंब होत असल्याच्या तक्रारी आहे. पूर्वीच जंगली डुक्कर व रोही यामुळे शेतीचे नुकसान झाले. यापुढेही वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होणार यात शंका नाही. अशातच विद्युत पुरवठ्यामध्ये गैरसोय झाल्यास रबीची पेरणी करायची की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
राज्य सरकारच्या विद्युत कंपनीला महावितरण असे संबोधले जाते. मात्र प्रत्यक्षात वीज वितरणाची सोय पाहता महावितरण न म्हणता महामरण असेच म्हणण्याची पाळी आली आहे. या शब्दात बळीराजा रोष व्यक्त करीत आहे.सद्यस्थितीत सर्वच जलाशयात काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. वीज निर्मितीसाठी लागणारा दगडी कोळसाही पुरवठा होत आहे. आणि वीज निर्मीती करणारे अधिकारी - कर्मचारी रोज सेवा देत आहे. एवढी सारी जमेची बाजू असताना विद्युत पुरवठ्याची गैरसोय ग्रामीण नागरिक व बळीराजावर का ओढवली जाते, असा प्रश्न या निमित्ताने ग्रामीण शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
या अथवा कोणत्याही कारणाने शेतीचे नुकसान झाल्यावर आणि सर्वत्र आंदोलने छेडल्यानंतर मदतीचे पाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली जातात. निवडणुकीच्या वेळी बळीराजाला पुढारी- नेत्यांकडून समस्या सोडविण्याचा लालीपॉप दाखविला जातो. मात्र ऐन संकटकाळी साऱ्यांकडूनच पाठ फिरविली जात असल्याचा शेतकरी व ग्रामस्थ यांचा आरोप आहे.
शेतकऱ्यांना खरी गरज असेल ती सिंचन व्यवस्था, २४ तास योग्य दाब असलेला वीज पुरवठा, स्वस्त दरात बि-बियाणे, खत, कृषी साहित्य, शेतीमालाला योग्य भाव आणि संकटकाळी सरकारी मदत याची. ही मदत शासकीय यंत्रणांनी पुरवावी, अशी बळीराजाची अपेक्षा आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांचे दिवस सुधारणार आहे, अन्यथा त्यांची चिंता कायमच राहणार आहे. (वार्ताहर)