अतिक्रमणामुळे गुदमरतोयं चंद्रपूरचा श्वास
By Admin | Updated: May 17, 2015 01:26 IST2015-05-17T01:26:23+5:302015-05-17T01:26:23+5:30
चंद्रपूर शहर वरकरणी बरे दिसत असले तरी ते आतल्या आत दाटीवाटीमुळे गुदमरत आहे. प्रत्येक गल्लीबोळात फोफावलेले अतिक्रमण यासाठी कारणीभूत आहे.

अतिक्रमणामुळे गुदमरतोयं चंद्रपूरचा श्वास
रवी जवळे ल्ल चंद्रपूर
चंद्रपूर शहर वरकरणी बरे दिसत असले तरी ते आतल्या आत दाटीवाटीमुळे गुदमरत आहे. प्रत्येक गल्लीबोळात फोफावलेले अतिक्रमण यासाठी कारणीभूत आहे. मनपा प्रशासन यापासून अनभिज्ञ नाही. मात्र कारवाई करण्यासाठी मनपा प्रशासनाचे हात अद्याप धजावले नाही. अतिक्रमणावर बेधडकपणे चालणारा बुलडोजरही मागील दहा वर्षात मनपाला मिळाला नाही. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत असून अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखापर्यंत पोहचली आहे. चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच आहे. त्यामुळे महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्ग हे मुख्य रस्ते समजले जातात. या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. नगर विकास आराखड्यात महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग सुमारे ७० ते ८० फुट रुंद असावा, असे नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही रस्ते सुमारे ५० फुट रुंदच आहे. रस्ते तयार करताना पूर्वीच नगर विकास आराखड्याची अमलबजावणी पालिका प्रशासनाने केली नाही. आता मनपा प्रशासनही या भानगडीत पडताना दिसून येत नाही.
आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजुला वाहनांची पार्र्कींग असते. त्यामुळे वाहनांच्या मार्गक्रमणासाठी केवळ ३० फुटाचाच रस्ता शिल्लक राहतो. चंद्रपुरात मनपा झाली तरी हे मार्ग रुंद होऊ शकले नाही. या रस्त्यांवरच बाजारपेठ असल्याने अनेक व्यावसायिकांनी रस्त्यांवर पक्के बांधकाम केले आहे. काही जागा व्यावसायिकांची असली तरी नगर विकास आराखड्यानुसार महापालिकेने रस्त्यांसाठी ही जागा व्यावसायिकांकडून संपादन केली नाही. मनपाने पादचाऱ्यांसाठी रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथ तयार केले. मात्र या फुटपाथवरही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. ही बाब सर्वांच्याच दृष्टीस पडते. दरम्यान, मनपाच्या एका आमसभेत सर्व नगरसेवकांनी हा प्रश्न उचलून धरला आणि रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. याबाबतचा कृती आराखडा तयार करण्यात येणार होता. नगरविकास आराखड्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण करताना मनपा भूसंपादनही करणार होते. महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग या दोन रस्त्यांचा विचार केला तर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. या अतिक्रमणावर बुलडोजर चालणे अपेक्षित होते. प्रारंभी सहा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विचारात घेण्यात आले होते. रस्त्यांवर निळी लाईन टाकण्यात येणार होती. तिथपर्यंत विहित रस्ता असेल. त्यासमोरची जेवढी जागा नियमानुसार सोडायची असेल, तिथे रेड लाईन टाकण्यात येणार होती. अतिक्रमणधारकांना दोन महिन्याची मुदत देण्यात येणार होती. अतिक्रमण काढले नाही तर थेट बुलडोजर चालवून रस्ता मोकळा करण्यात येणार होता. असे मनपा आयुक्तांनीच यापूर्वी स्पष्ट केले होते. मात्र ही कार्यवाही नियमबाह्य इमारतीसारखीच मनपा आयुक्तांनी मध्येच थांबविली, नव्हेतर सुरूच केली नसल्याचे दिसून येते.